• Sat. Sep 21st, 2024
भूतबाधेची भीती दाखवून महिलेची १३ लाखांनी फसवणूक, जादूटोणा करणारे दोघे गजाआड

नागपूर : घरात भूतबाधा झाली असून, त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, असे सांगून त्या दूर करण्यासाठी पूजेच्या बहाण्याने महिलेकडील रोख रकमेसह १२ लाखांचे दागिने हडपण्यात आले. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांच्या मदतीने दोघांना अटक केली. ईश्वर ऊर्फ इंद्र पप्पू शर्मा (वय ३५, रा. ओंमकारनगर), सुनील पप्पू शर्मा (वय ३८) व साहिल चिरंजीलाल भार्गव (वय १९), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. करिष्मा (नाव बदललेले, वय ३८, रा. हुडकेश्वर) यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ईश्वर आणि सुनील अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

-पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, नोव्हेंबर २०१६मध्ये करिष्मा यांचे दीपक (बदलेले नाव) याच्यासोबत लग्न झाले. लग्नानंतर सतत वाद होत असल्याने करिष्मा या माहेरी आल्या. त्यांनी पतीविरुद्ध तक्रारही दिली. २०१२मध्ये करिष्मा यांच्या आईचे तर यावर्षी वडिलांचे निधन झाले.

-करिष्मा आणि दीपक यांचे समुपदेशन सुरू असता एका ओळखीच्या व्यक्तीने ईश्वर शर्मा याच्याबाबत करिष्मा यांना माहिती दिली. ‘तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे. पूजा व मंत्राचा जाप करून ती दूर करता येऊ शकते. त्यासाठी २० हजार रुपयांचा खर्च येईल’, असे ईश्वरने त्यांना सांगितले. त्यानंतर तिघांनी भूतबाधेची भीती दाखवून वेळोवेळी करिष्मा यांच्याकडून रोख ६ लाख ५३ हजार रुपये तसेच साडेपाच लाख रुपये किंमतीचे दागिने घेतले.

-ईश्वरने शुक्रवारी करिष्मा यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. ‘घरात आत्मा आहे. तिला बाहेर काढण्यासाठी पूजा करावी लागेल. यासाठी ५० ग्रॅम सोन्याचे दागिने लागतील’, असे ईश्वर त्यांना म्हणाला.

-करिष्मा यांनी नागपुरात राहणाऱ्या लहान बहिणीला याबाबत सांगितले. त्यांच्या बहिणीने करिष्माकडून प्रकरणाची माहिती घेतली असता हा प्रकार उघडकीस आला.

-त्यांच्या बहिणीने अंधश्रद्ध निर्मुलन समितीच्या सदस्यांना याबाबत सांगितले. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ईश्वर तसेच साहिल हे दोघे दागिने घेण्यासाठी मानेवाड्यातील वैरागडे हॉस्पिटलसमोर आले. याचदरम्यान समितीच्या सदस्यांनी दोघांना पकडून हुडकेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. पोलिस फरार सुनीलचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed