यंदाच्या महोत्सवाविषयी बोलताना श्रीनिवास जोशी म्हणाले, “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा केवळ शास्त्रीय संगीताचा महोत्सव नसून ती एक चळवळ देखील आहे. नव्या जुन्या कलाकारांचा संगम साधण्याचा प्रयत्न आम्ही दरवर्षी करीत असतो, याही वर्षी हा मेळ आम्ही साधला आहे.”
चालू वर्ष हे पं. कुमार गंधर्व, पं. राम मराठे आणि पं. सी. आर. व्यास यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या तीनही दिग्गज कलाकारांना आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने त्यांच्या परंपरेतील कलाकार यावर्षी महोत्सवात आपली कला सादर करतील असेही श्रीनिवास जोशी यांनी नमूद केले.
महोत्सवाची वेळ पहिल्या दिवशी (१३ डिसेंबर) दुपारी तीन वाजता अशी असेल. यानंतर दि १४ व १५ डिसेंबर या दोनही दिवशी महोत्सव दुपारी ४ वाजता सुरु होईल. शनिवार दि. १६ डिसेंबर रोजी महोत्सव दुपारी ४ वाजता सुरू होईल आणि परवानगी मिळाल्यास रात्री १२ वाजेपर्यंत असेल. शेवटच्या दिवशी (१७ डिसेंबर) महोत्सवाची वेळ दुपारी १२ ते रात्री १० अशी असणार आहे.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सुरुवात तुकाराम दैठणकर आणि सहकारी यांच्या मंगलमय सनई वादनाने होईल. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाचा समारोप होईल. शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती, बेगम परवीन सुलताना, सतारवादक नीलाद्री कुमार हे देखील महोत्सवात कला सादर करणार आहेत.