• Sat. Sep 21st, 2024
शिवमहापुराण कथा सोहळ्यातून ३५ तोळे सोन्याचे दागिने लंपास, भाविक पस्तावले

म.टा. वृत्तसेवा सिडको : पाथर्डीतल्या शिवमहापुराण कथा सोहळ्यातून १८ महिलांचे ३५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकुण १७ लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

पाथर्डी गावात मंगळवार दिनांक २१ नोव्हेंबर शिवमहापुराण कथेला प्रारंभ झाला. कथा श्रवणासाठी सुमारे अडीच लाख भाविकांची उपस्थिती होती. नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनही अनेक महिलांनी याठिकाणी हजेरी लावली. कथा सोहळ्याला येताना महिला वर्गाला सोन्याचे दागिने परिधान करू नये, दागिने सांभाळावे असे आयोजन समितीसह पोलीस प्रशासनानेही वारंवार सांगितले असतानाही हजारो महिला सोन्याचे दागिने परिधान करून आल्या होत्या.

एकीकडे कथा सोहळा सुरू असताना यावेळी दुसरीकडे चोरट्यांनी त्यांची दिवाळी साजरी केल्याचे दिसून आले. मंगळवारी दिवसभरात एकूण ४३ महिलांची सोनसाखळी मंगळसूत्र चोरीला गेल्याची तक्रार येथील पोलीस मदत केंद्रात नोंद करण्यात आली. यापैकी १८ महिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मंगळसूत्र सोनसाखळी चोरी गेल्याचा गुन्हा नोंद केला आहे. एकूण ३५७ ग्रॅम म्हणजेच सुमारे ३५ तोळे वजनाचे १७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातून लंपास केले आहे. यामुळे सोनसाखळी चोरी गेल्याचे महिलांची चांगलीच धांदल उडाली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी ३ संशयित महिलांना ताब्यात घेत चौकशी केली होती. मात्र अजूनपर्यंत एकही सोनसाखळी चोरटा पोलिसांना मिळून आलेला नाही. अजूनही किमान २० महिलांकडून सोनसाखळी चोरी गेल्याची तक्रार पोलिसात करण्यात आलेली नाही. मंगळवारी सकाळी १ वाजेपर्यंत शिवमहापुरण कथेच्या पोलीस मदत कक्षात ४ महिलांच्या सोनसाखळ्या मंगळसूत्र चोरी गेल्याची तक्रार करण्यात आली होती. अजूनही पुढील ३ दिवस कार्यक्रम सुरू राहणार असल्याने महिलांनी मूल्यवान दागिने परिधान करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गर्दी

बुधवारी सकाळपासून अनेक महिलांनी सोन्याचे दागिने चोरी गेल्याची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी गेली होती. यात विशेष म्हणजे २ ते अडीच तोळे सोने चोरी गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एका शेतकरी महिलेचे ९ तोळ्याचे मंगळसूत्र चोरी झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed