• Mon. Nov 25th, 2024
    निलेश लंके यांच्या मनात नेमकं काय? पवारांबद्दल बोलून दाखवली मनातली गोष्ट

    अहमदनगर : आमदार निलेश लंके हे त्यांच्या अहमदनगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील ८ हजार मुस्लीम बांधवांसोबत खेड शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे ही इच्छा व्यक्त केली. आमदार लंके हे पवार कुटुंबाचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अनेक कार्यक्रमाना त्यांनी पारनेरमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांना बोलवलेलं आहे. सध्या ते राष्ट्रवादीच्या बंडखोर गटात जरी असले तरी त्यांनी आजही आपल्या बॅनरवरती शरद पवार यांचा फोटो लावलेला आहे. आपली शरद पवार यांच्यावरती श्रद्धा आहे. आपण जे काही आहोत ते शरद पवारांमुळे आहोत, असे देखील ते बऱ्याचदा म्हणतात. हेच दर्ग्याच्या दर्शनानिमित्ताने आलेल्या लंके यांच्या बोलण्यातून अधोरेखित झालं.

    यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की “मलाच काय, उभ्या महाराष्ट्रला वाटतं पवार फॅमिलीने एकत्र यावं”, असं उत्तर दिलं. पुढे ते म्हणाले की “मी गेल्या ८ वर्षांपासून मतदारसंघातील नागरिकांना नवरात्रीमध्ये मोहटा देवी दर्शनाला घेऊन जात असतो. ह्या वर्षी दीड लाख नागरिकांना नेले होते. ह्या वर्षी मतदार संघातील मुस्लिम महिलांनी मागणी केली की, आम्हाला दर्शनासाठी खेड शिवापूरच्या दर्ग्याला जायचं आहे. त्यासाठी हे आयोजन केलं आहे, असं निलेश लंके यांनी सांगितलं.

    आमदार मतदारसंघाचा कुटुंबप्रमुख असतो आणि कुटुंबातील लोकांच्या इच्छा पूर्ण करणं हे त्याचं कर्तव्य असतं, असं निलेश लंके यावेळी म्हणाले. आमदार लंके यांनी पवार कुटुंब एकत्र येण्याच्या केलेल्या विधानावरून अनेक वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. दिवाळी दरम्यान बारामतीत पवार कुटुंबाचा कौटुंबिक स्नेह दिसून आला.

    आमदार निलेश लंके जरी अजित पवार यांच्या गटासोबत महायुती सरकारमध्ये गेलेले असले तरी अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्यातली सुंदोपसुंदी जगजाहीर आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत विखेंविरुद्ध दंड थोपटण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न देखील सुरू आहेत. अशा परिस्थितीत कुणाशीही वैरत्वाची भावना न ठेवता किंबहुना शरद पवार गटाशीही जुळवून घेऊन विखेंना चितपट करण्याचा मनसुबा निलेश लंके यांचा आहे. त्यामुळे येत्या काळातील पवार कुटुंबाच्या अनुषंगाने घडणाऱ्या घडामोडींवर निलेश लंके यांचं लक्ष असेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed