• Sat. Sep 21st, 2024

क्रिकेटप्रेमी पुणेकर सज्ज; आजच्या भारत vs ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी जय्यत तयारी

क्रिकेटप्रेमी पुणेकर सज्ज; आजच्या भारत vs ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यासाठी जय्यत तयारी

म. टा. प्रतिनिधी, पुणे : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान आज (रविवारी) रंगणारा एकदिवसीय क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी पुणेकरांनी जय्यत तयारी केली आहे. हा महामुकाबला मोठ्या पडद्यावर पाहता यावा, यासाठी विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व राजकीय नेतेमंडळींनी विशेष व्यवस्था केली असून, हॉटेल-रेस्तराँमध्येही मोठे पडदे लावण्यात आले आहेत. इतकेच नव्हे, तर भारतीय संघाच्या विजयासाठी पुण्यनगरीचे आराध्यदैवत गणरायाला साकडे घालण्यात आले आहे.

अहमदाबादेतील नरेंद्र मोदी मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात महामुकाबला होणार आहे. त्याची जबरदस्त ‘क्रेझ’ पुण्यात सर्वत्र अनुभवायला मिळत आहे. अंतिम सामन्याचा रोमांच अनुभवण्यासाठी पुणेकरांमध्ये जबरदस्त उत्साह आहे. क्रिकेटप्रेमींना सामन्याचा आनंद घेता यावा, यासाठी शहरात अनेक ठिकाणी विशेष तयारी केली जात आहे. त्यासाठी गणेश मंडळांसह विविध सामाजिक संस्था-संघटनांचे पदाधिकारी व राजकीय नेतेमंडळी सरसावले आहेत. या सामन्याचा आनंद ग्राहकांसह सर्वांना मुक्तपणे लुटता यावा यासाठी त्यांनी मोठमोठे एलईडी स्क्रीन लावण्याचे नियोजन केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा व लोकसभेच्या आगामी निवडणुकांसाठी इच्छुक नेत्यांनी आपापल्या जनसंपर्क कार्यालयांत अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण आयोजित करून क्रिकेटप्रेमी मतदारांना निमंत्रित केले आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी; तसेच काही व्यापारी मंडळींनी थेट मंडप टाकून ‘स्क्रीन्स’ लावण्याची तयारी सुरू केली आहे. क्रिकेट रसिकांच्या मनोरंजनासाठी ढोल-ताशे, फटाके, ध्वनियंत्रणा, तिरंगी ध्वज, टॅटूचीही सोय करण्यात आली आहे.
विश्वचषकाच्या फायनलसाठी रेल्वे प्रशासन सोडणार स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळ…
‘रेस्तराँ’मध्ये सवलतींचा वर्षाव

शहरातील अनेक हॉटेल-रेस्तराँचालकांनी अंतिम सामन्याच्या थेट प्रक्षेपणासाठी मोठे पडदे लावले असून, क्रिकेटप्रेमींना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये खाद्यपदार्थ व मद्य खरेदीवर काही टक्के सवलत, एका डिशवर एक डिश फ्री अशा सवलतींचा समावेश आहे. आप्तस्वकीय व मित्रमंडळींसोबत एकत्र बसून सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी जिल्ह्यात फार्महाउस बुकिंगला मोठी पसंती दिली आहे.

विजयासाठी होम-हवन, महाआरती

अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजय मिळावा, यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेकडून होमहवन करण्यात आले. याशिवाय अनेक गणेश मंडळांनी गणरायाची महाआरती करून उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed