ते म्हणाले राजकीय स्वार्थाच्या भावनेतून सध्या विविध पक्षांच्या नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये होत आहेत. परंतु ही वेळ चुकीची वक्तव्ये करण्याची नसून संयमाने पुढे जाण्याची आहे. ओबीसींच्या किंवा अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले असतानाही विनाकारण विसंवाद निर्माण केला जातो आहे. राज्यात पहिल्यांदाच असे चित्र पहायला मिळत असल्याची खंत विखे यांनी व्यक्त केली. नेते मंडळींनी वादग्रस्त वक्तव्ये थांबविली तर सरकारला मराठा आरक्षणाच्या विषयाला गती देण्यासाठी वेळ मिळेल. नेत्यांना गावात प्रवेशबंदीचे फलक लावणे ही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतरची स्वाभाविक प्रतिक्रिया होती. आंदोलनांच्या वेळी असे फलक लागत असतात. त्यामुळे हे फलक तात्काळ हटवावेत ही मागणी चुकीची असल्याचे विखे म्हणाले.
भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेत. त्यांनी समाजाचे नेतृत्व करणे गैर नसले तरी आरक्षणाचा प्रश्न वेगळ्या दिशेने घेऊन जाऊ नये. सभा घेऊन अन्य समाजांना आव्हान देणे, सरकारच्या विपरीत वक्तव्ये करणे योग्य नसून समाजात द्वेष निर्माण करणारी वक्तव्ये राजकीय नेत्यांनी थांबवावीत असे मत विखे यांनी व्यक्त केले. पवारांनी दुटप्पी भूमिका सोडावी तसेच एक मराठा लाख मराठा म्हणून हा विषय संपवून टाकावा असेही ते म्हणाले.
मराठवाडावासियांनी हट्ट सोडावा
मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडावे यासाठी तेथील नेतेमंडळी सातत्याने भुमिका मांडत आहेत. मराठवाड्याला पाणी द्यायला आमचा विरोध नाही. परंतु वरच्या लोकांनाही दुष्काळाचा सामना करावा लागणार असून मराठवाडावासियांनी पाणी सोडण्याचा हट्ट धरू नये अशी विनंती विखे यांनी केली.
द्वेष पसरविणारी वक्तव्ये थांबवा : गोडसे
अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अनेक विषयांवर चुकीची माहिती दिली असून मराठा समाजाला डिवचण्याचे काम केले आहे अशी टिका खासदार हेमंत गोडसे यांनी केली. भुजबळ सातत्याने ओबीसींची ५४ टक्के लोकसंख्या आणि २७ टक्के आरक्षण असं म्हणत असले तरी राज्यात सरकारी वेबसाईटवर ओबीसींची संख्या ३२.८२ टक्के दर्शविली आहे. त्यामूळे चुकीची माहिती देऊन समाजात गैरसमज पसरविणे थांबवावे. समाजात द्वेष पसरेल अशी वक्तव्ये टाळावीत असे आवाहन गोडसे यांनी केले. सामाजिक तेढ निर्माण होऊ नये अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Read Latest Maharashtra News And Marathi News