ते पुढे म्हणाले की, २४ डिसेंबरपर्यंत सरकारने आरक्षण दिले नाही तर २५ डिसेंबरला समाजाची बैठक घेऊन पुढील दिशा जाहीर करू. मात्र याबाबत जो काही निर्णय होईल तो शांततेत होईल. मात्र सरकारला तो निर्णय खूप जड जाईल, असेही जरांगे म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात दौंड तालुक्यातील वरवंड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जरांगे पाटील बोलत होते. मराठा आरक्षणाला विरोध करणारे वाढणार आहेत. मतभेद होऊ देऊ नका. सरकार आणि समाजातीलच काही लोक स्वार्थासाठी समाजाच्या विरोधात भूमिका घेऊ शकतात. कारण सरकारकडे पर्याय राहिला नसल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले.
जरांगे पाटील म्हणाले की, आपल्या समाजातील कार्यकर्त्यांना पुढे घालून मराठा आरक्षणाला विरोध करायला लावायचा. हा एकमेव पर्याय सरकारकडे उरला आहे. त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या त्यांना आरक्षण नको म्हणायला लावायचं, अशी भूमिका मांडायला लावू शकतात. त्यामुळे त्यांच्या हातापाया पडून सांगा की, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या. हातातोंडाला आलेल्या आरक्षणाच्या घासात विष कालवण्याचे काम करू नका, असा इशारा ही जरांगे यांनी दिला. विजयाचा क्षण जवळ आला आहे. आपल्यात मतभेद होऊ देऊ नका. कोणता नेता जर मतभेद करत असेल तर त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवा. मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्याला कधीच माफ करायचं नाही, असेही जरांगे म्हणाले.
दरम्यान जरांगे पाटील बोलत असताना माइकमधून डबल आवाज येत असताना तो बंद करा असे म्हणत माणसं इकडं ते बोलतोय तिकडं आरक्षणाचं ही असंच झालं. आमचं आरक्षण इथं आणि आम्हाला हिंडायला लावलं ५०% च्या वर त्यातच पन्नास पिढ्या गेल्या. घेणं नाही देणं नाही. घे ५० टक्केच्या वर तू घे ना आम्हाला कशाला देतो. तू खातो आतलं. आमचं खातो तुझं खातो. तू ओबीसीचं खातो ओपनमध्ये येतो. ईडब्ल्यूएसमध्ये येतो. खातो तरी किती. तुला साऱ्या दुनियाचं पुरेना. तरीही म्हणतो आमच्यात येऊ नको, असे म्हणत जरांगे पाटील यांनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.