आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या आघाड्यांमध्ये जागावाटपाच्या प्राथमिक चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी अशी बहुतांश ठिकाणी थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पवार गटाने मुंबईतील सहापैकी एका जागेवर दावा केला असल्याचे समजते.
राज्यात लोकसभेच्या ४८ जागा असून, त्यात मुंबईतील सहा जागांचा समावेश आहे. २०१९च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेने मुंबईच्या सहा जागांवर विजय संपादन केला होता. तथापि, २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय चित्र बदलले आहे. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून त्या दोन्ही पक्षांत दोन गट निर्माण झाले आहेत. याचा जागावाटपावर परिणाम होणार आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी तयारी सुरू केली आहे. याठिकाणी राखी जाधव अथवा धनंजय पिसाळ हे उमेदवारीच्या चर्चेत असले तरी पवार ऐनवेळी दुसरा उमेदवारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईतील सहापैकी दोन काँग्रेस, एक जागा राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला तीन जागा देण्याची महाविकास आघाडीत प्राथमिक चर्चा आहे.