• Sat. Sep 21st, 2024

‘बिस्किटप्रिय’ डॉक्टरची चौकशी पूर्ण; भूल दिल्यानंतर महिलांना ठेवले होते ताटकळत

‘बिस्किटप्रिय’ डॉक्टरची चौकशी पूर्ण; भूल दिल्यानंतर महिलांना ठेवले होते ताटकळत

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : कुटुंब नियोजन शस्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर चार महिलांच्या शस्रक्रियेस ऐनवेळी नकार देत ग्रामीण भागातील रुग्णालयातून काढता पाय घेणाऱ्या बिस्किटप्रिय सरकारी डॉक्टरची चौकशी पूर्ण झाली आहे. त्याचा अहवालही लवकरच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांपुढे सादर केला जाणार आहे.

काय आहे प्रकरण?

ग्रामीण भागात आधीच आरोग्य सुविधांची वानवा असताना मौदा तालुक्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या या असंवेदनशीलतेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. डॉ. तेजराम भलावे, असे या डॉक्टरचे नाव आहे. खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबर रोजी डॉ. भलावे हे आठ महिलांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणार होते. यातील चार महिलांवर त्यांनी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी भारती नितेश कानतोडे (रा. पाहुनी), प्रतिमा प्रमोद बारई (रा. ढोलमारा), करिष्मा श्रीधर राजू (रा. खात) आणि सुनिता योगेश झांजोडे या चार महिलांना त्यांनी भूलसुद्धा दिली. परंतु, यादरम्यान वेळेवर चहा न मिळाल्याने डॉ. भलावी हे प्राथमिक आरोग्य केंद्रातून बाहेर पडले ते परतलेच नाहीत. शस्त्रक्रियेसाठी आलेल्या चार महिला तशाच ताटकळत राहिल्या. या असंवेदनशील प्रकारावरून संबंधित महिलांच्या नातेवाइकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठांनी दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था केली. ‘आपल्याला मधुमेह असून आपल्याला वेळेवर चहा-बिस्किटे लागतात. ती न मिळाल्याने आपल्या रक्तशर्कराचे स्तर खालावले व आपला रक्तदाबही खालावला. त्यामुळे आपल्याला तेथून काढता पाय घ्यावा लागला’, असे स्पष्टीकरण डॉ. भलावी यांनी आपल्या वरिष्ठांना दिल्याचे कळते.
भारतीय ठरतायेत जीवघेण्या आजाराचे बळी, WHOने केलं अलर्ट, जगात सर्वाधिक रुग्णांची नोंद
उद्या अहवाल सादर

शस्त्रक्रियेस नकार देण्यात आलेल्या महिलांच्या नातेवाइकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगलाच गोंधळ घातला होता. तेथे काही काळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. संबंधित प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी चौकशीचे मौखिक आदेश दिले. त्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापित करण्यात आली असून तीन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले होते. ही चौकशी पूर्ण झाली आहे. मात्र, दिवाळीच्या सुट्यांमुळे हा अहवाल सादर झाला नाही. तो उद्या गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी सादर होणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed