क्रिकेटचा उत्साह ठीक आहे मात्र अशाप्रकारे काळ्याबाजारात तिकीट खरेदी करताना फसवणूक होण्याचा धोका असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
भाऊबीजेच्या दिवशीच भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याची पर्वणी असून हा सामना वानखेडे स्टेडियमवर आहे. ऑनलाइन तसेच इतर माध्यमातून सामन्याची तिकिटे याआधीच विकली गेली आहेत. सामन्याच्या मुहूर्तानुसार भाऊबीजेचा सण साजरा करण्याचा कार्यक्रम रसिकांनी निश्चित केला आहे. भाऊबीज असूनही अनेकजण अजूनही हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये जाण्यास उत्सुक असून, मिळेल त्या दराने तिकीट खरेदी करण्याची त्यांची तयारी आहे.
रसिकांच्या क्रिकेटवेडाचा फायदा घेत काळ्या बाजारात २५ हजार रु. ते १ लाख रुपयांपर्यंत तिकिटाची बोली लागली आहे. मात्र, पोलिसांनी रसिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ही तिकिटे बनावट किंवा याआधी वापरण्यात आलेली असू शकतात; त्यामुळे ती खरेदी करणे टाळा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
काळाबाजार करणारा अटकेत
मूळ किंमतीपेक्षा जास्त दराने काहीजण भारत न्यूझीलंड सामन्याची तिकिटे विकत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. या आधारे पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जे. जे. मार्ग पोलिसांच्या पथकाने मालाड येथून आकाश कोठारी या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून काही तिकिटे हस्तगत करण्यात आली असून, याबाबत तपास सुरू आहे. आकाशचे साथीदारही यामध्ये गुंतले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
‘भाऊबीजेचा मुहूर्त दिवसभर’
‘भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या सेमीफायनलच्या दिवशी भाऊबीजेचा मुहूर्त असल्याने मुंबईकरांमध्ये क्रिकेट की भाऊबीज असा संभ्रम निर्माण झाला आहे. पण भाऊबीजेचा संपूर्ण दिवस महत्त्वाचा असल्याने कोणत्याही वेळी दिवसभरात भाऊबीज साजरी केली तरी चालेल’ अशी माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. ‘बहीण-भावाचे नाते रक्ताचे असून, ते मुहूर्तावर अवलंबून नसते. भाऊबीजेचा पूर्ण दिवस शुभ असून दिवसभरात कधीही बहिणीने ओवाळावे’, असेही ते म्हणाले.