बीड आणि जालन्यातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. त्यामुळे २४ तारखेपर्यंत काहीही बोलता येणार नाही. बीडमधील राजकीय नेत्यांची घरे, कार्यालये यांची तोडफोड मराठा आंदोलकांनी केली नसून त्यांच्यातील अंतर्गत वादातून राजकीय वादातून ही जाळपोळ झाली आहे. त्यामुळे मराठा समाज नाहक असे गुन्हे दाखल झालेले खपवून घेणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
ओबीसी नेत्यांना मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांना लक्ष्य केले. जालन्यातील भोकरदन येथील बोरगाव जहागीर येथे जे घडलंय ते तेथील आमदार आणि मंत्र्यांची मस्ती आहे. त्यांनी आज आमचे बोर्ड फाडले, उद्या त्यांचे देखील बोर्ड राहतील. मराठ्यांनी मनात घेतलं तर त्यांनी तर फक्त आमचे बोर्ड फाडले आम्ही त्यांचे कपडेसुद्धा फाडू शकतो. मराठा समाजाला मी शांत ठेवले आहे. मराठा समाजाला हू जरी म्हटलं तरी मराठा समाज त्यांची पूर्ण जिरवील. सामान्य मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर त्यांना आयुष्यभर गुलाल लागणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांना दिला.
तसेच मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांच्या हातात काहीच नाही, ते काहीही बरळतील. मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. राज्यातील आणि देशातील कोणतीही शक्ती आली तरी मराठ्यांना आरक्षणापासून रोखू शकत नाही. धनगर बांधवांचं एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण आहे. ते घटनेने दिलं आहे, तुम्ही त्यांना ते देऊ देईना, असा आरोपही जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांवर केला.
दरम्यान, यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाबाबत राज्य सरकारकडून सुरु असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी समाजाने केली आहे. गाव बंदीचा निर्णय त्या त्या गावचा आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असल्याने समाज आनंदी आणि आशावादी झाला आहे. समाजाचा आशीर्वाद आणि गाठीभेटी घेण्यासाठी १५ नोव्हेंबर पासून ते २३ नोव्हेंबरपर्यंत दौऱ्यावर जाणार असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.