मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मयूर सरोदे यांचे परिसरात रुग्णालय आहे. त्या ठिकाणी शनिवारी दुपारी अनिकेत आला. काहीवेळ रुग्णालयात थांबल्यानंतर ‘थोड्या वेळात येतो’, असे सांगून चार वाजेच्या सुमारास तो बाहेर पडला. मात्र, रात्री उशिरापर्यंत अनिकेत परत न आल्याने पोलिसांना कळविण्यात आले. डॉ. सरोदे आणि पोलिसांचे पथक अनिकेतचा शोध घेत होते. तेव्हा एका खासगी रुग्णालयाच्या आवारात सहाव्या मजल्यावरून युवकाने उडी घेतल्याचा फोन उपनगर पोलिसांना मिळाला. पथक घटनास्थळी पोहोचल्यावर अनिकेत रक्ताच्या थारोळ्यात दिसला.
डॉ. सरोदे यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे खासगी रुग्णालयातील डॉ. अतुल अग्रवाल यांनी घोषित केले. अनिकेत सरोदे याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान ही घटना लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी शनिवारी दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह असताना मात्र नाशिक शहरात हा अनुचित प्रकार घडला आहे. या घटनेने मात्र डॉक्टर दापत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान अनिकेतचे वडिल प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ तर आई बालरोग तज्ज्ञ आहे. अनिकेत इयत्ता दहावीचे शिक्षण घेत होता. अभ्यासात हुशार असलेल्या अनिकेतने आतापासूनच ‘नीट’ची तयारी सुरू करून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न बघितले होते. परंतु, अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्याचे आणि त्याच्या पालकांचे स्वप्न अधुरेच राहिले. पोलिसांनी अकस्मात मृत्युनुसार प्राथमिक तपास सुरू केला आहे. त्यातून आत्महत्येमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात आत्महत्या करणाऱ्याच्या संख्येत वाढ झाली असून युवकांचा देखील यात समावेश आहे.