ओवी पवन पोळ ही चार वर्षांची चिमुकली सर्वात जास्त भाजली. तिला तातडीने प्रथम महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयानंतर सातारा येथे व त्याच रात्री अधिकच्या उपचारासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात ओवीला भरती करण्यात आले. आगीत गंभीररित्या भाजलेली ओवी जेवढा वेळ आगीत होती, त्यावेळी तिच्या शरीरात कार्बन गेला. या कार्बनमुळे शरीरातदेखील जखमा झाल्या होत्या. रुग्णालयात ओवी गेल्या १८ दिवस मृत्यूशी झुंज देत होती.
या १८ दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे हे सतत चौकशी करीत होते. वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, आ. मकरंद पाटील, आ. धंगेकर, पुणे व महाबळेश्वर येथील अनेक मान्यवरांनी रुग्णालयाला भेटी देऊन ओवी व तिच्या बरोबर उपचार घेत असलेल्या चिमुकल्यांची चौकशी करत होते. सातारा व पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही रुग्णालयाच्या संपर्कात राहून उपचारावर लक्ष ठेवले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी देखील प्रयत्नांची पराकाष्टा केली. परंतु काळाने अखेर डाव साधला आणि ओवीची झुंज अपयशी ठरली. आज तिची प्राणज्योत मालवली.
ओवीचा मृत्यू झाल्याची माहिती महाबळेश्वर शहरात पसरली. ती ज्या आळीत राहात होती, त्या कोळी आळीमध्ये शोककळा पसरली. ओवीच्या या अकाली मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शामगाव (ता. कराड) येथे आज तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाबळेश्वर शहरातून नागरिक अंत्ययात्रेसाठी उपस्थित होते.