उच्च न्यायालयाने फटाके वाजवण्याची वेळ रात्री ८ ते १० अशी निश्चित केलेली असतानाही मुंबईत धनत्रयोदशीच्या दिवशी, तसेच शनिवारीही या मर्यादेच्या व्यतिरिक्त फटाकेबाजी करण्यात आली. काही ठिकाणी रात्री १२नंतरही फटाके फुटत होते. पोलिसांची वाहने संध्याकाळी मुंबईच्या विविध भागांमधून फिरताना नागरिकांनी पाहिली. तरीही फटाक्यांसाठी निश्चित केलेल्या वेळेपलीकडे आतषबाजी होत असल्याचे समोर आले.
मुंबईच्या हवेची गुणवत्ता एकूण आकडेवारीवरून समाधानकारक असली, तरी मुंबईकरांना धुरक्याचा त्रास जाणवत आहे. दिवाळीमध्ये फटाके वाजवल्यानंतर दरवर्षीच हवेची गुणवत्ता खालावते, असे अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सफर या प्रदूषण मापन प्रणालीच्या माध्यमातूनही समोर येतात. या पार्श्वभूमीवर शाळांमधूनही फटाके वाजवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र दिवाळीचा आनंद चारच दिवस मिळतो, या कारणासह मुंबईकर फटाके मोठ्या प्रमाणावर वाजवतात. यामध्ये आवाजी फटाक्यांसोबत, आकाशात रोषणाई करणारे फटाकेही असतात. रोषणाई करणाऱ्या फटाक्यांमधील रोषणाई करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे अधिक धूर होतो. मात्र याची नागरिकांना जाणीव नसल्याने या प्रदूषणाकडेही दुर्लक्ष होते.
धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक मुंबईकरांनी फटाके फोडण्यास सुरुवात केली. शनिवारीही काही प्रमाणात फटाके वाजले. याची सुरुवात संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच काही भागांमध्ये झाली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी याचे प्रमाण सर्वाधिक असेल. व्यापारी वर्ग नव्या वर्षाचे स्वागत करताना फटाके मोठ्या प्रमाणात वाजवतो. त्यामुळे रविवारी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाला फटाक्यांमुळे नोंदल्या जाणाऱ्या प्रदूषणाकडे अधिक लक्ष असेल. धनत्रयोदशीप्रमाणेच रात्री उशिरापर्यंत मुंबईच्या विविध भागांमध्ये फटाके फोडले जातील, असाही अंदाज आहे. उच्च न्यायालयाने निर्देश दिले, तरी अभ्यंगस्नान झाल्यावर पहाटे फटाके वाजवण्याची परंपरा यंदाही पाळली जाईल, अशी शक्यता आहे.
यंदा विक्री चांगली
गेल्या वर्षापेक्षा यंदा फटाक्यांची चांगली विक्री झाल्याचे फटाक्यांच्या घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले आहे. फटाक्यांच्या दुकानातील गर्दीही हेच चित्र स्पष्ट करत होती. त्यामुळे लक्ष्मीपूजनानंतर मुंबईत वाजणाऱ्या फटाक्यांवरून याचा नेमका अंदाज येऊ शकेल.