• Sat. Sep 21st, 2024

जायकवाडीच्या पाण्याचा तिढा कायम,पैठण येथे रास्ता रोको आंदोलन, पाणीवाटपाचं नेमकं प्रकरण काय?

जायकवाडीच्या पाण्याचा तिढा कायम,पैठण येथे रास्ता रोको आंदोलन, पाणीवाटपाचं नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणात उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले नाही. आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय अधांतरी आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कायद्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी मराठवाडा पाणी परिषदेने केली आहे. तर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पैठण येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

नाशिक-नगर जिल्ह्यातील धरणातून समन्यायी पाणी वाटप नियमानुसार जायकवाडी धरणात ८.६० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिले होते. या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर उच्च न्यायालयाने आणि नंतर सर्वोच्च न्यायालयानेही निर्णयाला स्थगिती दिली नाही. समन्यायी पाणी वाटप नियमानुसार १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी धरणात पाणी सोडणे अपेक्षित होते. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांनी ८.६० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. पण, या आदेशाची अंमलबजावणीची जबाबदारी नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांची आहे. नाशिक-नगर भागात आंदोलने सुरू झाल्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर निर्णयाची प्रतीक्षा होती. न्यायालयाने स्थगिती दिली नसून पुन्हा सुनावणी ठेवली आहे. स्थगिती आदेश नसल्यामुळे पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत आहे. पाणी सोडण्यास उशीर झाल्यास पाण्याचा अधिक अपव्यय होईल. सध्या नदीचे पात्र काही प्रमाणात ओले असल्यामुळे अधिक पाणी झिरपणार नाही. पण, निर्णयाला अधिक उशीर झाल्यास निम्मेच पाणी जायकवाडीत पोहचण्याची भीती जलतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर दुःखाचा डोंगर; सहलीला आलेले विद्यार्थी समुद्रात उतरले अन् अनर्थ, तरुण बेपत्ता
घटलेला पाणीसाठा

जायकवाडी धरणात ४७ टक्के पाणीसाठा आहे. नगर-नाशिक जिल्ह्यांतील बहुतांश धरणात ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी आहे. उर्ध्व भागातील धरण समूहातून (मांडओहोळ, मुळा) २.१० टीएमसी, प्रवरा समूहातून (भंडारदरा, निळवंडे, आढळा, भोजपूर) ३.३६ टीएमसी, गंगापूर समूहातून (गंगापूर, काश्यपी, गौतमी, गोदावरी) ०.५ टीएमसी, गोदावरी दारणा समूहातून (आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी) २.६४३ असे एकूण ८.६० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

पैठण येथे रास्ता रोको

समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार मंजूर साडेआठ टीएमसी पाणीसाठा त्वरित जायकवाडी धरणात सोडावा या मागणीसाठी शुक्रवारी पैठण-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर शेतकऱ्यांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेतकरी सहभागी झाले होते. यावर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने गांभीर्याने विचार करत जायकवाडी धरणात पाणी सोडावे. तसेच, आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यात व खेर्डा प्रकल्पासाठी ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडावे अशा मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात अनिल घोडके, सुरेश दुबाले, अप्पासाहेब गायकवाड, दिगंबर तांगडे, दीपक हजारे, चंद्रकांत झारगड, उद्धव मापारी, विष्णूपंत नलावडे, भगवान कबाडी, किशोर काळे आदी सहभागी झाले.

तहानलेल्या गावासाठी बळीराजाचा मोठेपणा; सिंचनाच्या पाण्याने भागवली गावकऱ्यांची तहान

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed