मयत सागर यादव आणि आरोपी केशव पवार यांच्यात सोमवारी दुपारी जुना गंज भागात वाद झाला होता. काहींच्या मध्यस्तीत दोघामधील वाद मिटवला. मात्र भांडणाचा बदला घेण्यासाठी रात्री ८ वाजेच्या सुमारास आरोपी केशव पवार आणि त्याचे दहा ते बारा सहकारी गोणीमध्ये तलवारी आणि खंजर ठेवून दुचाकीने सराफा भागात पोहचले. त्यानंतर टोळक्यानी सागर आणि त्याच्या भावावर तलवारीने हल्ला केला. डोक्यात तलवारीचा घाव घातल्याने सागर यादव हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ भानू यादव हा देखील जखमी झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस निरीक्षक अभिनाश कुमार यांच्यासह पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या खूनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. अंगाचा थरकाप उडवणारी हल्ल्याची घटना परिसरातील सीसीटीव्ही काॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी इतवारा पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे
मागील काही दिवसापासून नांदेड मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. छोट्या छोट्या कारणावरून मारहाण, खून केले जातं आहे. सर्रासपणे टोळक्याकडून शस्त्राचा वापर केला जातं आहे. पोलिसांचा कुठलाच वचक या गुन्हेगारांना राहिली नाहीये, असं चित्र पहावयास मिळत आहे.
१५ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
दरम्यान, या घटनेत जवळपास १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पुढे अजून काही जणांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत. तत्काळ घटना नंतर नांदेड पोलिसांनी तत्परता दाखवून रात्री उशिरापर्यंत आरोपींना धरपकड करण्यात आली. कोणत्याही आरोपींना यात गय केली जाणार नाही. भांदवि ३०७,३०२,१२०(ब),४/२५ आर्म ऍक्टसह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस तपास करतायेत. सर्व आरोपींची नाव निष्पन्न झाली आहेत. तपासाअंती सर्व काही सांगता येईल, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे.