• Mon. Nov 25th, 2024
    छगन भुजबळांनी वात पेटवली, आता मुंबईतील बंगल्यावर ओबीसी नेत्यांची जमवाजमव, पुढे काय घडणार?

    मुंबई: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यांनी सोमवारी जालना आणि बीड येथे मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झालेल्या मालमत्तांची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याविरोधात आवाज उठवला होता. यावेळी त्यांनी ओबीसी समाजाला आपले आरक्षण वाचवण्यासाठी जमेल त्या मार्गाने विरोध करण्याचे आवाहन केले होते. छगन भुजबळांच्या या वक्तव्यानंतर ओबीसी समाजाचे नेते एकवटायला सुरुवात झाली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीला प्रकाश शेंडगे, जे.पी. तांडेल, लक्ष्मण गायकवाड यांच्यासह इतर ओबीसी नेते आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहतील. त्यामुळे या बैठकीत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत ओबीसी नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

    जमेल त्या मार्गाने सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध करा, ओबीसींना एकवटण्याचं छगन भुजबळांचं आवाहन

    तर दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रमुख बबनराव तायवाडे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हेदेखील आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविरोधात बोलण्यासाठी कोणताही ओबीसी नेता पुढे येत नाही. फक्त छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे दोनच नेते उघडपणे ओबीसी आरक्षणावर बोलत आहेत. छगन भुजबळांनी काल भूमिका मांडली की, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. फक्त ओबीसींना मिळालेल्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तसेच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला नको, असे मत बबनराव तायवाडे यांनी मांडले.

    भुजबळांचे वक्तव्य म्हणजे हिंसेला उत्तेजन, जरांगे पाटलांचा वार, दोघांमध्ये पुन्हा वाद धुमसण्याची शक्यता

    तर सर्वांनाच उपाशी मरण्याची पाळी येईल: विजय वडेट्टीवार

    ओबीसी समाजातील ५० ते ६० टक्के जाती अशा आहेत की, ज्यांच्याकडे जमीन नाही, घर नाही. ओबीसी प्रवर्गात राहूनही त्यांची स्थिती सुधारलेली नाही. मराठा नेते म्हणतात की, ओबीसींसाठी आमच्या मुलांनी आत्महत्या कराव्यात का? ओबीसी प्रवर्गात अगोदरच इतक्या जातींचा समावेश आहे. त्यामध्ये मराठ्यांचा समावेश झाल्यास कोणाच्या वाट्याला काय येणार? अशाने सर्वांनाच अर्धवट आरक्षण मिळेल, उपाशी मरायची पाळी येतील. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्यास, ‘बळी तो कान पिळी’ सूत्रानुसार मोठ्या समाजालाच त्याचा फायदा मिळेल, अशी भीती विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

    जाळपोळ प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याला कायदा म्हणत नाहीत, भुजबळांचं टीकास्त्र

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed