पुणे येथून एनडीआरएफच्या टीमने शर्थीचे प्रयत्न केल्यावर यश आले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा साडेदहापासून सुरू झालेले रेस्क्यू ऑपरेशन अखेर सोमवारी सायंकाळी थांबलं आहे. या रेस्क्यू ऑपरेशनसाठी खोपोली आणि खालापूर येथील रेस्क्यू टीमची मदत झाली. ही दुर्घटना घडल्यानंतर येथे महाड परिसरातील स्थानिकांनीही मदत केली. या दुर्घटनेत कंपनीत आग लागून बेपत्ता झालेल्या मृतदेह मिळालेल्या कामगारांमध्ये जीवन कुमार चोबे,अभिमण्णु उरॉव, विकास महाती, शेखराव भुसारे,अक्षय सुतार राहणार तळीये, सोमीनाथ विधाते, विशाल कोळी,संज्ञेय पवार ,असलम शेख, सतिष साळुंखे, आदित्य मोरे या कामगारांचा समावेश आहे, अशी माहिती महाड तालुका प्रशासनाकडून सोमवारी सायंकाळी देण्यात आली.
या सगळ्या मृतदेहांचे डीएनए टेस्ट करून त्याचा अहवाल आल्यानंतरच हे मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मारुती आंधळे यांनी दिली. या कामगारांच्या नातेवाईकांचे डीएनए टेस्टसाठी सॅम्पल यापूर्वीच घेण्यात आले आहे. ३ नोव्हेंबर शुक्रवारी सकाळी साडेदहा ते बारा या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी ब्लू जेट फार्मासिटिकल कंपनी व्यवस्थापनाच्या अद्याप पर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र या प्रकरणी मिळालेल्या अकरा मृतदेहांचे प्रथमदर्शनी पंचनामे करण्यात आले आहेत.
या घटनेची चौकशी करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे पाटील यांनी चौकशी समिती नियुक्त केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. या परिस्थितीवर रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बेनापुरे, महाड तहसीलदार महेश शितोळे येथील स्थानिक मंडळींबरोबरच या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी मोठे सहकार्य केले. पुण्यातून दाखल झालेल्या तीस कर्मचाऱ्यांनी आणि दोन अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्नाने हे ऑपरेशन पूर्ण केले आहे. रेस्क्यू टीममध्ये महिलांचाही समावेश आहे.