• Sat. Sep 21st, 2024

सायबर शाखेला आता पोलिस ठाण्याचा दर्जा; ऑनलाइन फसवणुकीची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवता येणार

सायबर शाखेला आता पोलिस ठाण्याचा दर्जा; ऑनलाइन फसवणुकीची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवता येणार

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सायबर शाखेची स्थापना करण्यात आली होती. आता या शाखेला सरकारने पोलिस ठाण्याचा दर्जा मंजूर केला आहे. त्यामुळे आता सायबर फसवणुकीसंदर्भातील तक्रार सायबर शाखेतील पोलिस ठाण्यात जाऊन नोंदवता येणार आहे. पूर्वी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात होता. या पोलिस ठाण्याच्या कामकाजाचे धोरण येत्या काही दिवसांत निश्चित केले जाणार आहे. दरम्यान, वाढत्या सायबर गुन्हेगारीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आता समाज माध्यमांवरील रील्सचीही मदत घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

मिरा-भाईंदरसह वसई-विरारमध्ये ऑनलाइन फसवणूक झालेल्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. दररोज सरासरी पाच ते सहा जणांची ऑनलाइन फसवणूक होते. त्यांच्या फसवणुकीच्या एकूण रकमेचा आकडा कोट्यवधींच्या घरात आहे. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आजवर बैठका आयोजित करत, नागरिकांमध्ये जनजागृती केली जात होती. मात्र आता जनजागृतीसाठी समाजमाध्यमांवरील रील्सचा वापर करण्याचा निर्णय मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाने घेतला आहे. त्यासाठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी सायबर गुन्हेगारीविषयक जनजागृतीसंदर्भातील विषयांवर रील्स तयार करून ते सायबर शाखेच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होईल, असा विश्वास पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी व्यक्त केला.
दिवाळीत Online Shopping करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी; सावधगिरी बाळगा, नाहीतर व्हाल कंगाल
जनजागृतीसाठी वेगवेगळे मार्ग

ऑनलाइन फसवणूक होऊ नये, यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत पोलिसांकडून जनजागृती केली जात आहे. त्यासाठी पोलिसांकडून सोसायट्या, शाळा, कॉलेजांमध्ये तसेच दुकानदारांच्या बैठका घेऊन माहिती दिली जात होती. त्यासाठी पथनाट्ये, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फलकांद्वारे जागृती आदी मार्गांचा अवलंब केला जातो. आता, इन्स्टाग्रामसारख्या समाज माध्यमांवरील रील्सची मदत घेतली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed