मुंबईतील हवेच्या प्रदूषणावर केल्या जात असलेल्या उपाययोजनांची प्रगती जाणून घेण्यासाठी अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी शुक्रवारी बैठक घेतली. रस्ते व पदपथांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेच्या वतीने वाहन आधारित धूळप्रतिबंधक यंत्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यासोबतच, सर्व प्रशासकीय विभागांमध्ये स्वच्छतेची कामे केली जात आहेत. मुंबईसह महानगर प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. पालिकेने ठरवून दिलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटकोर अंमलबजावणी करण्यात यावी. विशेषतः रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अधिक दक्षतेने कामे करण्यात यावीत, असे निर्देश डॉ. शिंदे यांनी दिले आहेत.
धूळप्रतिबंधक यंत्र वाहने अधिकाधिक संख्येने तैनात करावीत. पालिकेने वायुप्रदूषणासाठी जाहीर केलेल्या सूचनांप्रमाणे, बांधकाम साहित्य तसेच राडारोडा (डेब्रीज) ने-आण करणारी वाहने झाकलेली असावीत. ही वाहतूक करताना, प्रत्येक खेपेस त्यावर पाण्याची फवारणी करावी. वाहनांची पूर्ण स्वच्छता करावी. राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित असावी. पालिकेच्या यंत्रणेसोबत व्हेईकल ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग सिस्टीम यंत्रणा लिंक करावी, असे शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. टोल प्लाझा स्वच्छतेसाठी राज्य रस्ते विकास महामंडळाला सूचित करण्यात यावे, असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.
६० फुटांपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर, तसेच पदपथांवरील धूळ हटवण्यासाठी आधी ब्रशिंग करून नंतर पाणी फवारणी केली जाते आहे. ज्या रस्त्यांवर तसेच पदपथांवर अशी कार्यवाही करावयाची आहे, त्यांची निवड विभाग कार्यालयांनी केली आहे. जिथे वाहनांची व नागरिकांची अधिक वर्दळ असते अशा रस्ते व पदपथांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पाणी टँकरची संख्या, टँकर फेऱ्यांची संख्या आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुरवठ्याचा सर्वात जवळचा स्रोत यांचा समावेश तपशीलवार आराखड्यात करण्यात येत आहे. पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा तसेच तलाव, विहीर, कूपनलिका यामधील पाण्याचा वापर केला जात असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांनी नमूद केले.
पहाटे ३ ते ६ दरम्यान धुलाई
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनमानात व्यत्यय येऊ नये आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कमी वर्दळीच्या कालावधीत म्हणजे पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान रस्ते धुण्याची कामे केली जात आहेत. तर काही विभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या वेळेत ही कार्यवाही केली जात आहे. रस्ते व पदपथ धुण्याचे काम ३ ते ४ तासांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.