दिवाळीतील धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण नातेवाईकांसह साजरे करण्याची प्रथा आहे. दिवाळीत शाळा-महाविद्यालयांनाही मोठी सुट्टी असल्याने सहकुटुंब गावी जाण्यासाठी गर्दी असते. यामुळे रेल्वे, खासगी गाड्यांसह एसटीही प्रवाशांनी भरून धावत असतात.
यंदा ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून अर्थात ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबरदरम्यान एसटीच्या सर्व बसश्रेणींमध्ये १०% भाडेवाढ लागू करण्यात येत आहे. २८ नोव्हेंबरनंतर मुळ दराने तिकीट आकारणी सुरू होणार आहे. आरक्षित तिकीटाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव भाडेदरातील फरकाचे पैसे प्रवास करताना द्यावे लागणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
एसटी ताफ्यातील १४ हजार बस प्रवासी सेवेत धावत आहेत. शिवनेरी, ई-शिवनेरी, शिवाई, अश्वमेध, परिवर्तन (लालपरी), हिरकणी, शितल, विना वातानुकूलित शयनयान, विना वातानुकूलित आसनी व शयनयान अशा सर्व बसश्रेणींसाठी भाडेवाढीनूसार तिकीट आकारण्यात येणार आहे.
महसूल वाढीसाठी महामंडळाकडून अनेक उपाय राबवण्यात येत आहेत. दरवर्षी दिवाळी हंगामात १०% हंगामी भाडेवाढ लागू केली जाते. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनामुळे बंद आगारातील वाहतूक शुक्रवारी पूर्ववत झाली आहे. यामुळे दिवाळीतील उत्सव वाहतूक निर्विघ्न आणि सुरळितपणे पार पडेल, असा विश्वास एसटी महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.