अपवाद वगळता यंदा विभागात सर्वदूर पुरेसा पाऊस झाला नाही. ऐन पावसाळ्यात अनेक भागातही अनेक जिल्ह्यात टँकर सुरु होते. विभागातील नांदेड, बीडसह अन्य जिल्हे टँकरमुक्त झाले असले तरी छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन जिल्ह्यात उन्हाळ्यापासून सुरु असलेले टँकर आजही सुरु आहे. उलट त्यात दिवसागणित वाढ होत असल्याचे चित्र आहे. १९ सप्टेंबरच्या दरम्यान या दोन्ही जिल्ह्यातील ८६ गावे व २५ वाड्यांना १०७ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. तर सध्या १०४ गावे व २५ वाड्याना १२४ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २६ गावे व १९ वाड्याना ८४ टँकरद्वारे तर जालन्यातील २६ गावे व १९ वाड्यांना ४० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
पैठणमध्ये ३१ टँकर :-
धरण उशाशी अन् कोरड घशाला अशी परिस्थितीत पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. जायकवाडी धरण या तालुक्यात असून देखील यंदा पाऊस समाधानकारक न झाल्याने पैठण तालुक्यातील २४ गावे व ५ वाड्याना ३१ टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ३१ गावांना २५ टँकरद्वारे, फुलंब्रीत ८ गावांना ९ टँकरद्वारे, गंगापुर तालुक्यातील ७ गावांना ७ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. यासह कन्नड ३, वैजापुरातील २ तर सिल्लोड तालुक्यातील ४ गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु असल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासह जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील ७, बदनापुर तालुक्यातील १७, भोकरदन १०, मंठा १ आणि घनसावंगी तालुक्यातील तहानलेल्या १० गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.