मुंबई, दि. ३१ : मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हा बाल संरक्षण कक्ष अंतर्गत दत्तक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. १४ ते २१ नोव्हेंबर २०२३ हा कालावधी दत्तक महिना असून ज्या दाम्पत्यास मूल दत्तक घ्यावयाचे आहे त्यांनी cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली जात आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.एच.नागरगोजे यांनी केले आहे.
सद्य:स्थितीत दत्तक विधानाबाबत केंद्र सरकारने केंद्रीय दत्तक ग्रहण प्राधिकरणाची (Central Adoption Regulation Authority) स्थापना केली आहे. ही संस्था महिला व बाल कल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात याबाबत कामकाज करणारी यंत्रणा जिल्हा बाल संरक्षण कक्ष म्हणून कार्यरत आहे. ज्या दाम्पत्यास मूल दत्तक घ्यावयाचे आहे त्यांनी cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर प्रशासकीय इमारत, पहिला मजला, दुसरा टप्पा, आर. सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर मोनोरेल स्टेशन जवळ, चेंबूर, मुंबई- ४०००७१ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२-२५२३२३०८ यावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. नागरगोजे यांनी केले आहे.
*****
संध्या गरवारे/विसंअ/