• Sat. Sep 21st, 2024

Mira-Bhayandar: कारखान्याला लागलेली आग विझवताना कर्मचारी जखमी, कंत्राटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Mira-Bhayandar: कारखान्याला लागलेली आग विझवताना कर्मचारी जखमी, कंत्राटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : भाईंदरमध्ये एका कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलामध्ये मदतनीस म्हणून कार्यरत असणारा कंत्राटी कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. या कर्मचाऱ्याला कोणतीही सुरक्षित साधने पुरवण्यात न आल्याने ही घटना घडली आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भाईंदर पश्चिमेला फाटक परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गाळे आहेत. येथील एका कारखान्यात रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच मिरा-भाईंदर पालिकेच्या नवघर येथील अग्निशमन केंद्रातील पथक दाखल झाले होते. येथील आगीवर नियंत्रण मिळवताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी आगीवर नियंत्रण मिळवताना कंत्राटी तत्त्वावर असलेला मदतनीस रवींद्र गुरव यांच्या मानेवर ज्वलनशील पदार्थ पडल्याने ते किरकोळ भाजले. त्यांच्यावर जवळच्या खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून त्यांना नंतर घरी सोडून देण्यात आले.

आगीवर नियंत्रण मिळवताना गुरव यांच्याकडे सुरक्षासाधने नसल्यामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. ते साहित्य कंत्राटदाराने पुरवणे अपेक्षित असले तरी त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे कर्मचारी सांगतात. परिणामी, स्थायी कर्मचाऱ्यांचे साहित्य अनेकदा वापरावे लागते, अन्यथा सुरक्षा साधनांअभावी परिस्थितीला सामोरे जावे लागते. यापूर्वीही साप पकडताना एका कर्मचाऱ्याला सुरक्षा साधनांअभावी दंश झाल्याची घटना घडली होती. तर, एक कर्मचारी साप पकडत असताना खाली कोसळून जबर जखमी झाला होता.

रविवारच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला असून मनपा प्रशासन त्यांच्या सुरक्षेकडे कधी लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिरा-भाईंदर महापालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी दिले जाणारे वेतन व इतर सुरक्षा साधनांसंदर्भात महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी एक समिती स्थापन केली असून त्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed