• Sat. Sep 21st, 2024
पश्चिम रेल्वेवर मार्गिकेचे काम; मात्र प्रवाशांचे हाल, ट्रेन उशिराने धावत असल्याने स्थानकांवर गर्दी

मुंबई: पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना घर गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ट्रेन उशिराने धावत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. तसेच पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दरम्यान पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना शुक्रवारपासूनच प्रवासाच्या परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे. पश्चिम रेल्वेवरील खार आणि गोरेगावदरम्यान ८.८ किमीची सहावी मार्गिका सुरू करण्यासाठी २७ ऑक्टोबरपासून मुख्य जोडकाम सुरू झाले आहे. हे काम ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे लोकल फेऱ्या विलंबाने धावत आहेत.
ससून रुग्णालयातून ललित पाटीलचे पलायन; कामकाजावर प्रश्नचिन्ह, आता कैदी रुग्ण समितीच्या पुनर्रचनेचा निर्णय
याचा परिणाम मोठ्या प्रमाणात प्रवाशांवर झाला आहे. गोरेगाव स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. त्यांना बोरिवली लोकलमध्ये प्रवेश करणे ही अवघड जात आहे. यामुळे प्रवाशांकडून काही प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. गोरेगाव स्थानकावरून रात्री १० ते ११ दरम्यान प्लॅटफॉर्म ५ वरून ३ बोरिवली लोकल गेल्या. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली. गोरेगाव स्थानकावरील प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नव्हते. शेकडो लोक प्लॅटफॉर्मवर गाड्यांची प्रतीक्षा करत थांबले होते. गाड्या उशिरा का येत आहेत, याची काही माहिती दिली जात नव्हती. अखेर काही लोकांनी बाहेर जाऊन बसचा आधार घेतला.

तर दुसरीकडे काही रेल्वे स्थानकावर अचानक लोकलचे प्लॅटफॉम बदलण्यात येत आहे. यामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच स्थानकावर घोषणाही विलंबाने होत असल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत. ट्रेन स्थानकात आल्यानंतर अचानक डब्बे पुढे जात असल्याचेही प्रवाशांनी सांगितले आहे. यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. लोकल गाड्या सुमारे २० ते २५ मिनीटे उशिराने धावत आहेत. पश्चिम मार्गावर वसई-विरारकडे जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दीही झालेली दिसून येत आहे.

पुढचे पाच दिवस कीर्तन बंद, इंदुरीकर महाराजांचीही मनोज जरांगेंना भक्कम साथ

चर्चगेटवरून अंधेरीला यायला सुमारे दीड तास लागत आहे. तसेच १०.२० ला बोरिवलीहून निघालेली चर्चगेटकडे जाणारी धीमी लोकल मालाड-गोरेगावच्या मध्येच थांबली होती. त्यानंतर राममंदिरला प्लॅटफॉर्म नसल्याने ही लोकल तिथे थांबवण्यात न आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. दरम्यान याचा परिणाम बस आणि रिक्षावरही झालेला दिसून येत आहे. स्थानकांबाहेर बस आणि रिक्षासाठी प्रवाशांची गर्दी झाली आहे. लोकल फेऱ्या विलंबाने धावत आहेत. यामुळे हा आठवडा रेल्वे प्रवाशांची परीक्षा पाहणारा असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed