• Thu. Nov 28th, 2024

    पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानसाठी तुरुंगात फिजिओथेरपी, बेड आणि नर्सची सोय

    पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानसाठी तुरुंगात फिजिओथेरपी, बेड आणि नर्सची सोय

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक घोटाळा प्रकरणात चार वर्षांपासून तुरुंगात असलेला मुख्य आरोपी एचडीआयएल कंपनीचा संस्थापक प्रवर्तक राकेश वाधवान याला प्रकृतीच्या कारणाखाली जामीन मंजूर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा नकार दिला आहे. मात्र, त्याचवेळी त्याच्यासाठी आर्थर रोड तुरुंगात फिजिओथेरपिस्ट व परिचारक उपलब्ध करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना दिले. मधुमेह, रक्तदाब, मूत्रपिंडाचा जुनाट आजार, मूत्रसंसर्ग अशा विविध आजारांनी त्रस्त असल्याने वैद्यकीय उपचारांसाठी जामीन मंजूर करावा, अशी विनंती वाधवानने केली होती.

    वाधवान पिता-पुत्रांना दणका; कोर्टाने अंतरिम जामीन नाकारला

    त्यामुळे न्या. भारती डांगरे यांनी जे. जे. रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याच्या वैद्यकीय तपासणीअंती अहवाल मागवला होता. शस्त्रक्रिया किंवा तातडीच्या उपचारांची आवश्यकता नाही, मात्र नियमित औषधोपचार व फिजिओथेरपीची आवश्यकता दिसते, असे अहवालात नमूद करण्यात आले. त्याचवेळी तुरुंगातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुरुंगात अनेक सुविधा उपलब्ध नसल्याचे म्हणणे मांडले. हे लक्षात घेऊन न्या. डांगरे यांनी वाधवानला योग्य बिछाना देण्यासह फिजिओथेरपिस्ट व परिचारक उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.

    किरीट सोमय्यांनी राकेश वाधवानला ब्लॅकमेल करून मुलाच्या कंपनीसाठी जमीन मिळवली; संजय राऊतांचा आरोप

    मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना ऑक्टोबर २०१९ मध्ये अटक केली होती. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात ४४ मोठ्या खातेदारांनी कर्ज बुडवले होते. यापैकी १० खाती ही एचडीआयएल आणि वाधवान यांच्याशी संबंधित होती.

    यापूर्वी राकेश वाधवान याला अंबानी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया करण्यास हायकोर्टानं सशर्त परवानगी दिली होती. साठी खाजगी रुग्णालयाच्या सहा आठवड्यांचा खर्चासह, पोलीस एस्कॉर्ट्स शुल्कही वाधवान यांनाच द्यावं लागेल असेही हायकोर्टानं स्पष्ट केले होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed