• Sat. Sep 21st, 2024

आरक्षण आंदोलनांनी शहर दणाणले; विविध भागांत साखळी उपोषण, हर्सूलमध्ये प्रतीकात्मक अंत्ययात्रा

आरक्षण आंदोलनांनी शहर दणाणले; विविध भागांत साखळी उपोषण, हर्सूलमध्ये प्रतीकात्मक अंत्ययात्रा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनांनी रविवारी शहर दणाणले. शहराच्या वेगवेगळ्या भागांत साखळी उपोषणे सुरू करण्यात आली आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांची हर्सूल परिसरात प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिक्षकांनी अंतरवाली सराटीपर्यंत दुचाकी फेरी काढली.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे पाचव्या दिवशीही उपोषण सुरू आहे. या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी शहरात रविवारी विविध भागांत साखळी उपोषण करण्यात आले. क्रांती चौकात विजय काकडे, ॲड. सुवर्णा मोहिते यांच्यासह आंदोलक उपोषण करीत आहेत. जटवाडा भागातील वॉर्ड क्रमांक तीन ते पाचमधील रहिवाशांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी शेकडो नागरिक उपोषणात सहभागी झाले. देवळाई, वानखेडेनगर, सातारा, पुंडलिकनगर या परिसरातही साखळी उपोषण सुरू आहे. जरांगे यांची प्रकृती ढासळल्यामुळे आंदोलक संतप्त झाले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून हर्सूल भागात निदर्शने करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणारे नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्ते यांचा आणि राज्य सरकारचा आंदोलकांनी निषेध केला. सकल मराठा समाजाच्या वतीने वाचाळवीरांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. एसबीओए परिसरातील तुळजाभवानी चौकात रविवारी सकाळी झालेल्या आंदोलनात तातेराव देवरे, कृष्णा मोटे, वैभव राऊत, अमोल मते, नितेश वहाटुळे, किशोर ठाकूर, रामभाऊ जाधव आदी सहभागी झाले होते. मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळल्यामुळे अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे. जरांगे यांनी दोन दिवसांत आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार असल्याची म्हटले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशन बंद पाडू! मराठा आरक्षणावरुन अजित पवार गटातील आमदाराचा सरकारला इशारा
दुचाकी फेरी रवाना

मनोज जरांगे यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी सकल मराठा समाज शैक्षणिक मंचने रविवारी क्रांती चौक ते अंतरवाली सराटी दुचाकी फेरी काढली. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी जरांगे दुसऱ्यांदा उपोषण करीत आहेत. त्यांच्या उपोषणाला बळ मिळावे आणि सरकारवर दबाव वाढविण्यासाठी दुचाकी फेरी काढण्यात आली. क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुचाकी फेरी अंतरवाली सराटी येथे रवाना झाली. या उपक्रमात भाई चंद्रकांत चव्हाण, धनंजय पाटील, अनिल घायवट, गणेश पवार, अजय कदम, मधुकर पाटील, राजकुमार वावरे, समाधान पंढरकर यांच्यासह चारशे शिक्षक सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed