आज दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपण मागे हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणासाठीचा आंदोलनाचा दुसरा टप्पा शांततेत सुरू आहे. मी आता मागे हटणार नाही, आमच्या समाजातील लेकरांवर होणारा अन्याय आता सहन होत नाही. क्षत्रियांनी रडायचे नसते, लढायचे असते. आंदोलन सुरु असेपर्यंत माझ्या कुटंबाला माझ्यासमोर आणू नका, असेही त्यांनी म्हटले आहे. आता माझा समाजच माझ्यासाठी पहिला आहे. मी आधी समाजाचा आहे, त्यानंतर कुटंबाचा आहे. मराठा बांधवांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवावे. मला काहीही होणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागे हटणार नाही, असा पक्का निर्धारही जरांगे यांनी व्यक्त केलाय.
मराठा आरक्षणावरची चर्चा मीडियाच्या कॅमेरासमोर होत नसते, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. “त्यांच्या कानात बोळे घातले आहे का? मग मी काल काय म्हणालो होतो? तुम्ही चर्चेला या.. मराठे तुम्हाला अडवणार नाही असे मी म्हणालो आहे. पण फक्त एकदाच चर्चा होणार. जोपर्यंत मला बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेसाठी यायले पाहिजे. त्यानंतर येऊन काही फायदा नाही”.
आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा, बाकी वळवळ करू नका
आमचे मराठे तुम्हाला कुठेच अडवणार नाही. आरक्षण द्यायचे की नाही एकदाच येऊन सांगायचे, बाकीची वळवळ करायची नाही. दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे मंत्री तानाजी सांवत म्हणत असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे का सांगत नाहीत? त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली.