• Sat. Sep 21st, 2024

CM शिंदे अचानक कोल्हापूरला पोहोचले; मध्यरात्री मुंबईला रवाना; गुप्त दौऱ्यात काय घडलं?

CM शिंदे अचानक कोल्हापूरला पोहोचले; मध्यरात्री मुंबईला रवाना; गुप्त दौऱ्यात काय घडलं?

कोल्हापूर: जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षण प्रश्नावर सुरू असलेल्या उपोषणाचा फटका आता सर्व राजकीय नेत्यांना बसू लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही याला अपवाद ठरले नाहीत. मराठा समाजाकडून सर्व नेत्यांना गाव बंदी केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री अतिशय गुप्तता पाळत “दबक्या पावलाने कोल्हापुरात आले.आणि थेट कणेरी मठ येथील सिद्धगिरी केंद्रातील सिर्वाचल पशुसंवर्धन केंद्राच्या उद्धघाटनास गेले. मठावरील विविध कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभानंतर ते तब्बल 8 तास कोल्हापुरात होते. मध्यरात्री तीनच्या सुमारास ते पुन्हा मुंबईला गेले.

रात्री आठ वाजता अचानक कोल्हापुरात

जालना येथे मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेल्या आंदोलनाची धग आता संपूर्ण राज्यात पसरली आहे. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत सर्व पक्ष नेत्यांना गावबंदी केल्याने नेत्यांच्या गाड्या अडवण्याचे प्रकार सुरू आहेत. कोल्हापुरातदेखील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा दोन वेळा अडवण्यात आला. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल कोल्हापुरात दबक्या पावलाने यावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कणेरी येथील सिद्धगिरी मठावरील विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी रात्री आठ वाजता कोल्हापुरात आले. मात्र त्यांच्या या दौऱ्याबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. संध्याकाळी पाच वाजता कोल्हापूर विमानतळपासून ते कणेरी मठापर्यंत मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र कोण येणार आहे हे अद्याप पोलीस आणि प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले नव्हते. साधारण आठच्या सुमारास ते कणेरी मठात दाखल झाल्यानंतर सुरवातीला मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ शूट करण्यापासूनही माध्यमांना अडवण्यात आले.

जरांगे पाटील यांनी प्रकरण जास्त ताणू नये
कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत हे सरकार मराठा समाजाला न्याय देणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच सर्वांनी धैर्य व धीर ठेवावा मराठा समाजाने सरकारला समजून घ्यावे तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी केले. मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणास बसलेल्या जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चिंता असल्याचे सांगितले. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवून दिल्या त्या दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे. मराठा समाज मागास आहे. असे सांगत शिंदे म्हणाले, कुणबी दाखले देण्याबाबत नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समिती ही अत्यंत चांगले काम करत आहे. आतापर्यंत आठ ते दहा हजार जुन्या नोंदी शोधल्या आहेत. अगदी हैदराबादमध्ये जाऊनही नोंदी तपासल्या जात आहेत. या सर्व कामाला काही अवधी लागणार आहे. यामुळे मराठा समाजाने धैर्य ठेवावे.तरुणांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये तसेच जरांगे पाटील यांनी प्रकरण जास्त ताणू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

मराठा आंदोलकांची पोलीस ठाण्यात झटापट
दरम्यान मुख्यमंत्री कोल्हापुरात दाखल होताच याबाबतची माहिती मराठा आंदोलकांना समजल्याने राजारामपुरी पोलीसानी सर्व मराठा आंदोलकांना त्वरित ताब्यात घेतले. मराठा आंदोलकांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यातच घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी मराठा आंदोलन आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट देखील झाली मात्र पोलिसांनी सर्वांना सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस ठाण्यातच ठेवलं व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्ण मुंबईकडे रवाना झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed