या संदर्भात पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, सहा वर्षांपूर्वी लग्न होऊन सासरी आल्यापासून आरोपी सासरे रतन म्हात्रे हे घरात वावरताना सुनेकडे आशाळभूत नजरेने पाहत असायचे. घरची कार शिकवण्याचे निमित्त करून कारमध्येच ते तिचा विनयभंग करत असत. आपण वडिलधारे आहात, असे काही करू नका, असे सुनेने वेळोवेळी याविषयी सासऱ्यांना सुनावले होते. मात्र सुनेच्या बोलण्याकडे ते दुर्लक्ष करत होते. लिफ्टमधून जाताना सासरे रतन यांनी वेळोवेळी विनयभंग केला. त्यावेळीही तसे न करण्याचे सुचविले होते.
लग्नाच्या दोन वर्षांनंतर गर्भवती राहिलेल्या सुनेला टोमणे मारले जायचे. बेडरूममध्ये मुलासह असतानाही त्यांनी विनयभंग केला. तुझा आणि तुझ्या मुलाचा जीव तुला प्रिय नाही का, अशा भाषेत सुनेला रतन यांनी धमकावले होते. त्यामुळे ते आपल्या जीवाचे बरेवाईट करू शकतात, अशी भीती सुनेला वाटली होती. दाद देत नसल्याचे पाहून व्हॉट्स ॲपवर अश्लिल मेसेज पाठवून ते आपल्याला मानसिक त्रास देत होते. हा विषय पतीला सांगूनही त्यानेही याविषयी परत न बोलण्याचे सांगून या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचे पीडित सुनेने तिच्या फिर्यादीत म्हटले आहे.
गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत मनात लज्जा उत्पन्न होईल असे अश्लिल कृत्य सासरे रतन म्हात्रे यांनी आपल्या बरोबर शोषण केले. आपला मोबाईल तोडून नुकसान केल्याचे सुनेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात पोलिसांनी सदर विवाहितेच्या तक्रारीवरून डोंबिवली पूर्वेकडे राहणाऱ्या ५८ वर्षीय रतन म्हात्रे सासऱ्याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४, ३५४-ड, ४२७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News