• Sat. Sep 21st, 2024

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कार्यपद्धतीसंदर्भात न्यायमूर्ती शिंदे समितीकडून जिल्ह्याचा आढावा

ByMH LIVE NEWS

Oct 28, 2023
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कार्यपद्धतीसंदर्भात न्यायमूर्ती शिंदे समितीकडून जिल्ह्याचा आढावा

बीड, दि. 28 (जि. मा. का.) :- मराठा समाजास मराठा -कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) आणि समिती सदस्यांनी आज 28 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात एका बैठकीत विविध विभागांच्या माहितीचा आढावा घेतला.

यावेळी समितीचे सदस्य सचिव व विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ -मुंडे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, न्याय व विधी सहसचिव सुभाष कराळे, उपायुक्त सामूहिक सामान्य प्रशासन जगदीश मणियार, विशेष कार्य अधिकारी शिवाजी शिंदे, अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी आदींची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे आतापर्यंत झालेल्या कामकाजाचा आढावा सादर केला.

सर्व यंत्रणांनी व्यवस्थितपणे आपापल्या अभिलेखात नोंदीची तपासणी करावी. मोडी तसेच उर्दू भाषेतील नोंदीचे तज्ञांकडून भाषांतर करून येत्या 5 दिवसात परिपूर्ण अशी आकडेवारी सादर करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री.आर्दड यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

समितीने घालून दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात 12 विभागांच्या 47 प्रकारच्या अभिलेखांमधून मराठा-कुणबी नोंद तपासण्याचे काम होत आहे. यात एकूण चार विभागाकडे 20 लाख 35 हजार 887 अभिलेखे तपासण्यात आले. हे केवळ चार विभागांचे आहेत. इतर 8 विभाग मिळून यात 22 लाखाहून अधिक नोंदी तपासण्यात आल्या. या चार विभागाचे अभिलेखांच्या तपासणी 3993 कुणबी-मराठा नोंदी आढळल्या आहेत. हे सर्व अभिलेखे 1967 पूर्वीचे आहेत.

तपासणी दरम्यान सर्वात जुना अभिलेख 113 वर्षे जुना आहे. तो 1910 सालच्या शिक्षण विभागाचा अभिलेख आहे. याची पाहणी समितीने केली. आढळून आलेल्या नोंदीची काही अभिलेखांच्या आधारे तपासणी या बैठकीत करण्यात आली. समितीच्या आढावा बैठकीनंतर नागरिकांनी सादर केलेले पुरावे,दावे स्वीकारण्यात आले. 122 जणांनी समिती पुढे आपले निवेदन सादर केले.

बैठकीत प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी  आभार मानले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed