• Sat. Sep 21st, 2024
आमदार अपात्रतेचा निर्णय तोंडावर, फडणवीस राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री? भाजपच्या ट्विटने खळबळ

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या युती आघाडींनंतर राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. सुरुवातीला महाविकास आघाडी स्थापन झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फोडत भाजपला साथ देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत.

आज महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन’ हा व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत. ‘महाराष्ट्राच्या निवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन’ अशा आशयाचा देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ भाजपच्या महाराष्ट्राच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असून त्यांनी सरकारला आता शेवटचा अल्टीमेटम दिला आहे. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला होता. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री बदलाचे बदलाच्या चर्चांना आणखीनच हवा मिळाली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपची ही नवीन खेळी असल्याचा देखील बोलले जात आहे.

त्यातच विधानसभा अध्यक्षांकडे शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी देखील सुरू आहे. या सुनावणीचा निकाल प्रलंबित असला तरी याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात आणखी मोठा भूकंप होणार असल्याच्या चर्चा आता भाजपच्या ट्विटनंतर सुरू झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed