मुंबई शहर परिवहन प्रकल्प (एमयूटीपी-३ अ) संचातील बोरिवली ते विरारदरम्यान २६ किमीच्या पाचव्या-सहाव्या मार्गासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बोरिवली ते भाईंदर आणि नायगाव ते विरार अशा दोन टप्प्यांमध्ये निविदा मागवण्यात आल्या आहेत. २० रेल्वे उड्डाण-पादचारी पूल, फलाट आणि छत उभारणी तसेच काही ठिकाणी फलाट अद्ययावत करणे, अशा कामांचा यात समावेश आहे.
नव्या दोन मार्गिकांमधील आठ रेल्वे स्थानकांत फलाट आणि अन्य बांधकामांच्या उभारणीसाठी एकूण २०० कोटी ५७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सप्टेंबरमध्ये निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सध्या एका विभागाच्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून अन्य निविदांची छाननी सुरू आहे. येत्या काही दिवसांत छाननी पूर्ण झाल्यावर कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येईल. त्यानंतर दोन्ही विभागांची कामे एकाचवेळी अर्थात दिवाळीनंतर सुरू होणार आहेत. कंत्राटदाराला ३० महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रूळ जोडणीला वेग
मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान पाचवी-सहावी मार्गिका उभारण्याचे काम पश्चिम रेल्वेकडून सुरू आहे. यापैकी खार ते सांताक्रूझदरम्यान सहावा मार्ग अन्य रेल्वेमार्गाला जोडण्याचे मुख्य काम २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
मार्गविस्ताराचा फायदा
बोरिवली ते विरारदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका तयार झाल्यावर मुंबई सेंट्रल ते विरार अशा सहा मार्गिका रेल्वेगाड्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. यामुळे मेल-एक्स्प्रेस पाचव्या-सहाव्या मार्गिकांवरून धावतील. तर, लोकलसाठी चार समर्पित मार्गिका तयार होणार आहेत.
मुंबई सेंट्रल ते बोरिवलीची सद्यस्थिती
मुंबई सेंट्रल ते खारदरम्यान जागेच्या अनुपलब्धतेमुळे सहाव्या मार्गिकेची कालमर्यादा अनिश्चित आहे. विलेपार्ले ते गोरेगाव दरम्यान नऊ किमीची सहावी मार्गिका तयार असून गोरेगाव ते बोरिवली मार्गिका मार्च २०२५पर्यंत तयार होणार आहे.
बोरिवली ते विरार पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत सुरू होईल. पहिल्या टप्प्याचा कंत्राटदार नियुक्त करण्यात आला असून, दुसऱ्या टप्प्यातील कंत्राटदार नियुक्तीनंतर नोव्हेंबरअखेरपर्यंत दोन्हींचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे.
– सुभाषचंद गुप्ता, अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक, मुंबई रेल्वे विकास महामंडळ
नव्या ८० किमीच्या रेल्वे मार्गिका
विस्तारीत महामुंबईतील लोकल जाळे वाढवण्यासाठी ८० किमीच्या नव्या मार्गिकांचा समावेश ३३ हजार ६९० कोटींच्या एमयूटीपी-३ अ प्रकल्पसंच सन २०१९मध्ये मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्पसंचातील संपर्काधारित रेल्वे नियंत्रण (सीबीटीसी) आणि २३८ एसी लोकल हे दोन प्रकल्प वगळल्यास नव्या ८० किमीच्या रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम विविध टप्प्यांत सुरू आहे.