• Sat. Sep 21st, 2024

कचऱ्याच्या धुराने शहर गुदमरले! श्वसनविकारांत वाढ, जागोजागी कचरा जाळण्याचा उद्योग सुरु

कचऱ्याच्या धुराने शहर गुदमरले! श्वसनविकारांत वाढ, जागोजागी कचरा जाळण्याचा उद्योग सुरु

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : एकीकडे हवेचे प्रदूषण लक्षणीय वाढलेले असतानाच कचरा जाळण्याचा उद्योग सर्वत्र आणि सर्रास सुरू असल्याचे जागोजागी दिसून येत आहे. पालापाचोळा जाळला जातोच; शिवाय प्लास्टिकही सर्रास जाळले जाते. परिणामी, शहर परिसरात श्वसनविकार झपाट्याने वाढत आहेत आणि पुन्हा या प्रकारांवर ना कुणाचे नियंत्रण आहे ना नियमन आहे, असेही सातत्याने समोर येत आहे.

शहर परिसरात हवेचे प्रदूषण नेहमीच वाढलेले असल्याचे कोणत्याही वेळेला दिसून येते. हवेची गुणवत्ता अर्थात एअर क्वालिटी इन्डेक्स हा गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ९९ युएस आढळून आला, ज्यामुळे प्रदूषण पातळी मध्यम असल्याचे उघड झाल्याशिवाय राहात नाही. पुन्हा शहरातील प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या ‘पीएम २.५’चे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषापेक्षा तब्बल सात पटींनी जास्त असल्याची नोंद संकेतस्थळावर दिसून येते. पुन्हा कोणत्याही वेळेला हे प्रमाण काही ना काही पटींनी जास्त असल्याचे नेहमीच आढळून येते. तसेच पीएम १०, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड व इतर घटकांचेही प्रमाण जास्तच आहे. त्याचाच परिणाम म्हणून शहर परिसरात श्वसनविकार, दमा, ॲलर्जीचे प्रमाण सतत वाढत आहे. एकीकडे हवेचे प्रदूषण वाढून हवेती गुणवत्ता ढासळत आहे, तर दुसरीकडे कचरा जाळण्याच्या समस्येने गंभीर वळण घेतल्याचेही अधोरेखित झाले आहे. घरासमोर एक दिवसआड घंटागाडी येत असूनही घंटागाडीत कचरा न टाकता अनेकजण सर्रास रस्त्यावर, डिव्हायडरवर, नाल्यात किंवा मोकळ्या जागेत कचरा टाकतात. नुसताच कचरा टाकला जात नाही तर अनेकजण वाट्टेल तिथे आणि वाट्टेल तो कचरा अगदी दररोज जाळतात. त्याचा धूर परिसरात कितीतरी वेळ पसरत राहतो आणि सध्याच्या वातावरणात तो हवेत बराच काळ राहतो. जशी थंडी जास्त पडेल, तसा हा धूर आणखी जास्त वेळ हवेत राहण्याचे प्रमाण वाढणार आहे. कचरा जाळण्याचा सर्वच नागरिकांना नाहक त्रास होतो. त्यातही लहान मुले, ज्येष्ठ व व्याधीग्रस्तांना हा त्रास जास्त होतो आणि दीर्घकाळ त्रास होत राहतो. मात्र या प्रकारावर ना कुणाचे नियंत्रण आहे ना नियमन आहे. त्यामुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच असल्याचेही दिसून येत आहे.

प्रत्येक भागात जाळला जातो कचरा

शहरातील प्रत्येक भागात कचरा जाळला जातो. घरांसमोर, दुकानांसमोर, सदनिकांलगत आणि अगदी शाळा-महाविद्यालय परिसरातही हेच चित्र आहे. अगदी सुशिक्षित लोकांकडूनही कचरा जाळला जातो आणि चक्क महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनही कचरा जाळला जातो, असे निरीक्षण पर्यावरणप्रेमी व वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य डॉ. किशोर पाठक यांनी नोंदवले. मात्र या प्रकारामुळे शहरातील हवा अतिशय खराब झाली आहे आणि यावर कुणाचाही अंकुश नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पुणेकरांनो, तुमची मुले खरंच सुरक्षित आहेत का? ९ महिन्यांत बाललैंगिक शोषणाचे ३२४ गुन्हे दाखल
शहर परिसरात कचरा जाळण्याची समस्या खूप जास्त गंभीर आहे आणि त्याचा त्रास सर्वांनाच होत आहे. पुन्हा जागोजागी हा प्रकार सहजच दिसून येतो. त्यामुळेच दमा, बालदमा, ॲलर्जी, श्वसनविकार, ब्राँकायटीस, डोळे खाजणे असे प्रकार आपल्या शहरात वाढत आहेत. या कचऱ्याच्या धुरामुळेच अनेकांचा त्रास लवकर कमी होत नाही आणि वारंवार तीव्र उपचार घ्यावे लागतात. याचे भान सर्वांनी राखणे खूप गरजेचे आहे.-डॉ. श्रीकांत पापीनवार, श्वसनविकारतज्ज्ञ

पालापाचोळा जाळला तरी मिथेन हा घातक वायू बाहेर पडतो, ज्याचा त्रास सर्वांनाच भोगावा लागतो आहे. पुन्हा प्लास्टिक जाळल्याने फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचीही भीती असते. मात्र, महापालिकेकडून या प्रकारावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे हे प्रकार खूप जास्त वाढले आहेत व वाढतच आहे. आश्चर्य म्हणजे हे प्रकार पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले तरी, शून्य कारवाई होते, हेही धक्कादायकच आहे.-डॉ. किशोर पाठक, पर्यावरणप्रेमी व वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed