कोण आहेत गुणरत्न सदावर्ते?
मराठा आरक्षणाला कोर्टात आव्हान मिळालं ते सदावर्ते दाम्पत्यामुळे… संविधान हीच अंतिम रेषा मानून चालणारं सदावर्ते दाम्पत्य हे एसटी आंदोलनामुळे चर्चेत असलं तरी यापूर्वीही गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील अनेकदा चर्चेत आल्यात. मूळचं नांदेडचं असलेलं हे दाम्पत्य मुंबईत विधीज्ञ म्हणून स्थायिक झालं आणि त्यांनी थेट पवार कुटुंबालाच नडणं सुरू केलं. मराठा समाजाचं आरक्षण असो किंवा एसटी आंदोलन, सदावर्तेंचा रोख थेट पवारांवर असतो.
ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत. त्यांनी एमबीबीएसपर्यंतचं शिक्षण घेतलं. याच काळात विद्यार्थ्यांसाठी अनेक आंदोलन केली. त्यांचं शिक्षण संभाजीनगर आणि मुंबईत झालं. काही वर्षांपूर्वी सदावर्ते नांदेडहून येऊन मुंबईत स्थायिक झाले आणि वकिली करू लागले. भारतीय राज्यघटनेचे ते अभ्यासक आहेत. किंबहुना त्यांनी संविधानावर पीएचडी केलीये. मॅट कोर्टातील विविध केसमुळे ते सातत्याने चर्चेत असतात. डॉक्टरांना काम बंद न करू देण्याची केस, सुप्रीम कोर्टातील ५० लाख कर्मचाऱ्यांचा खटला, मराठा आरक्षण आणि एसटी आंदोलन या त्यांच्या काही प्रमुख केस आहेत. सदावर्तेंचे वडील हे भारिप बहुजन महासंघाकडून नांदेडमध्ये नगरसेवकही होते.
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत एसटी आंदोलनातून बाहेर पडल्यानंतर सदावर्तेंची एन्ट्री झाली. एसटी संघटनेनेही त्यांना स्वीकारायला नकार दिला. पण कर्मचाऱ्यांना विलिनीकरणाची अपेक्षा दाखवण्यात सदावर्ते यशस्वी ठरले आणि कर्मचाऱ्यांनीही त्यांना साथ द्यायचं ठरवलं. पुढे एसटी आंदोलनाला यश आलं नाही. सदावर्तेंनीही टायमिंग साधून माघार घेतली. पण वकिलांच्या पोशाखात आंदोलनात सहभागी झाल्याने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली
सदावर्तेंच्या कुटुंबाची स्टोरीही इंटरेस्टिंग आहे. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील कॉलेजमध्ये असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे त्यांनी विवाह केला. या दोघांना झेन ही मुलगी आहे. २२ ऑगस्ट २०१८ ला परळच्या ‘क्रिस्टल प्लाझा’ या इमारतीला आग लागली तेव्हा सदावर्ते यांची तिसरीतील १० वर्षीय कन्या झेन हिने प्रसंगावधान दाखवत १७ जणांचे प्राण वाचवले होते. याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते झेन सदावर्तेला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
जयश्री पाटील तेवढ्याच चर्चेत
गुणरत्न सदावर्ते यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी जयश्री पाटील याही मागे नाहीत. त्या सुद्धा विविध याचिकांमुळे चर्चेत असतात. जयश्री पाटील यांचा जन्म माहूरगड या गावचा. त्यांचं शालेय शिक्षण तिथेच झालं. पुढे त्यांनी वकिलीचं शिक्षण औरंगाबादमध्ये घेतलं तर LLM मुंबईत केलं. त्यांनी क्रिमिनॉलॉजी या विषयात PhD केली आहे. मराठा आरक्षणाविरोधात २०१४ साली पहिली याचिका दाखल करणाऱ्या डॉ. लक्ष्मणराव किसनराव पाटील यांच्या त्या कन्या आहेत, तर अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत.
अनिल देशमुख यांच्याविरोधात जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती आणि उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. अनिल देशमुख बिझनेसमनकडून १०० कोटी वसूल करतात. ते स्वतः मराठा पुढारी आहेत, मसल पॉवर आहेत. इतकंच नाही तर शरद पवारांचा वरदहस्त त्यांच्या डोक्यावर आहे. पण ते ताकदवान नेते असले तरी त्यांना अभय नसावं, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जयश्री पाटील यांनी तेव्हा केली होती.