• Mon. Nov 25th, 2024
    सदावर्तेंच्या गाडीच्या काचा फोडणाऱ्या मराठा बांधवांच्या सुटकेसाठी हायप्रोफाईल वकील रिंगणात?

    मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाच्या मु्द्द्यावरुन सध्या वातावरण प्रचंड तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात फिरून मराठा आरक्षणासाठी वातावरणनिर्मिती करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. अशातच गुरुवारी सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा काही मराठा आंदोलकांनी फोडल्याचा प्रकार घडला. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडताना संबंधितांनी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’, अशा घोषणा दिल्या होत्या. याठिकाणी असलेल्या पोलिसांनी गाडीची तोडफोड करणाऱ्या तिघांना अटक केली होती. मंगेश साबळे, वसंत बनसोडे, राजू सावे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी या तिघांना अटक करुन पुढील कारवाईला सुरुवात केली होती.

    सदावर्तेंचे ‘श्रद्धेय’ मराठा समाजाच्या जीवावर मोठे झाले, आता आमच्याच लेकरांना मोठं होऊ देत नाही: मनोज जरांगे

    या सगळ्या घडामोडी सुरु असताना आता ॲडव्होटकेट सतीश मानेशिंदे या तीन मराठा आंदोलकांच्या मदतीला धावून आले आहेत. सतीश मानेशिंदे हे या सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मराठा आंदोलकांचं वकीलपत्र घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मानेशिंदे हे न्यायालयात मराठा आंदोलकांची बाजू मांडतील. यासाठी ते कोणतेही शुल्क आकारणार नसल्याचे समजते. पोलिसांनी सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर वीरेंद्र पवार आणि श्रीरंग बारगे यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या माहितीनुसार लवकरच ॲडव्होटकेट सतीश मानेशिंदे यांची टीम या मराठा आंदोलकांच्या सुटकेसाठी दाखल होणार आहे. आम्ही मराठा आंदोलकांच्या चुकीच्या कृत्याचे समर्थन करत नाही. मात्र, आमचा त्यांना पाठिंबा आहे, असे वीरेंद्र पवार यांनी सांगितले.

    मनोज जरांगेंच्या मुसक्या बांधा, तात्काळ अटक करा; गाडीच्या काचा फुटल्यानंतर गुणरत्न सदावर्ते संतापले

    सतीश मानेशिंदे हे देशातील आघाडीच्या वकिलांपैकी एक म्हणून ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा खटला लढवला होता. आर्यन खानची तुरुंगातून सुटका होण्यात सतीश मानेशिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यापूर्वी त्यांनी अनेक हायप्रोफाईल खटले लढवले आहेत. यामध्ये बॉलीवूडच्या आघाडीच्या कलाकारांचा समावेश आहे. १९९३ सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणात अभिनेता संजय दत्तचा खटला लढवणाऱ्या टीमचा ते एक भाग होते. संजय दत्तवर अत्यंत गंभीर आरोप असताना सतीश मानशिंदे यांनी त्याला जामीन मिळवून दिला होता. त्यामुळे कायदेशीर वर्तुळात सतीश मानेशिंदे या नावाभोवती एक वलय निर्माण झाले आहे.

    जरांगे पॉलिटीकल बॉसच्या आधारे बोलतात

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *