या सगळ्या प्रकारानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. मी मनोज जरांगे पाटलांना प्रश्न विचारु इच्छितो की, हीच तुमची शांततापूर्ण मराठा आंदोलनाची व्याख्या आहे का? अशाप्रकारेच हल्ले करुन मला शांत करता येणार नाही. सामान्यांच्या ५० टक्के जागांचे आरक्षण वाचवण्यासाठी माझा लढा आहे. मात्र, आज माझ्या गाडीच्या काचा फोडून माझ्या कष्टाचे आणि घामाचे नुकसान करण्यात आले. यापूर्वी मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथे घडलेल्या घटनेवेळी ३२ पोलीस कर्मचाऱ्यांना नाहक मारहाण झाली. कारण नसताना पोलिसांवर कारवाई झाली. माझी मुलगी झेन, पत्नी जयश्री पाटील आणि मला सतत धमक्या येत आहेत. या धमक्यांमुळे गेल्या आठ दिवसांपासून माझी मुलगी झेन शाळेत गेलेली नाही. झेनला ठार मारण्याच्या, जयश्री पाटील यांना उचलून नेण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. माझ्यावर अशाप्रकारचे हल्ले होतील, घात करण्याचा प्रयत्न होईल. मी सामान्यांच्या ५० टक्के जागा वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळेच आम्हाला त्रास दिला जात आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटलांच्या मुसक्या बांधा, त्यांना अटक करा: गुणरत्न सदावर्ते
गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या गाडीच्या तोडफोडप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना जबाबदार ठरवत त्यांना तातडीने अटक करा, त्यांच्या मुसक्या बांधा, अशी मागणी केली. २० पोलीस असताना मनोज जरांगे समर्थक माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. मनोज जरांगे पाणी पितात, सलाईन लावून घेतात, असं उपोषण होतं का?, असा बोचरा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी विचारला. मराठा आरक्षण हा निव्वळ फार्स आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणे अशक्य आहे, असेही सदावर्ते यांनी म्हटले.
माझ्यावरच्या हल्ल्याबद्दलची पोलिसांना कुणकुण लागली होती
काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो तेव्हा त्यांनी माझ्या समोर पोलीस आयुक्तांना फोन लावला. त्यानंतर एका कॅबिनेट मंत्र्यानेही पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यामुळे माझ्या घराच्या परिसरात २० पोलीस कर्मचारी तैनात होते. तरीही पोलिसांसमोर माझ्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाड्यांची तोडफोड करणारे हे लोक इमारतीत शिरुन माझ्या घरापर्यंत पोहोचण्याच्या तयारीत होते. मराठा आरक्षणामुळे समाज जातीपातींमध्ये विभागला जाईल, गुणवत्तेचे तुकडे होतील. ते टाळण्यासाठी मी माझी हत्या झाली तरी अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढा सुरु ठेवेन, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.