मुंबई, दि. १३ :- नागरिकांना विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेली, प्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकासकामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या) बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव जयश्री भोज, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील प्रत्यक्ष उपस्थित होते. तर पुणे मेट्रो, पीएमआरडीए, संबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी व्हिसीद्वारे उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे मेट्रो क्रमांक ३ चे कामाला वेग देतानाच शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालय, टाटा कंपनी आणि मेट्रो यांनी त्रिपक्षीय करार करण्याची कार्यवाही करावी. सातारा येथे उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या चतुर्थ श्रेणी पदे मंजूर नसल्यास ती तात्काळ मंजूर करावीत. अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारा निधी येत्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर करून घेण्यात यावा. कोकणाच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या रेवस ते रेड्डी किनारा महामार्गाला वेग देण्यासाठी स्वतंत्र बैठक लावण्यात यावी. पुणे बाह्य वळण रस्त्यासाठी भूसंपादनासाठी लागणारा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. वडाळा येथील जीएसटी भवनामध्ये शासकीय कार्यालयांसाठी कार्यालये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या अतिरिक्त बांधकामासाठीच्या परवानग्या घेण्याची कार्यवाही पूर्ण करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.
००००