• Sat. Sep 21st, 2024

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! डेंगीच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्यावर्षी पेक्षा दुप्पट पेशंट

महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! डेंगीच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्यावर्षी पेक्षा दुप्पट पेशंट

म. टा. प्रतिनिधी, पुणे : वातावरणातील बदलामुळे यंदा राज्यात सर्दी, ताप, खोकला या साथरोगांचे प्रमाण वाढले असतानाच आता डेंगीच्या रुग्णंची संख्या वाढली आहे. राज्यात गेल्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत डेंगीच्या सहा हजार ४४८ रुग्णांची नोंद झाली होती. यंदा १४ ऑक्टोबरपर्यंत १२ हजार ४५५ रुग्ण आढळून आले आहेत. यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंगीच्या रुग्णसंख्येत दृपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

यंदा रुग्णांचे प्रमाण वाढले असले तरी मृत्यूचे प्रमाण घटले आहे. राज्यात गेल्या वर्षी डेंगीमुळे २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यंदा १४ ऑक्टोबरपर्यंत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यंदा रुग्ण वाढले असले तरी गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात यावर्षी आतापर्यंत १७८ रुग्णांना प्रत्यक्षात डेंगी झाल्याचे तपासणी अहवालामध्ये समोर आले आहे. १७८ रुग्णांपैकी ६० रुग्ण हे १५-२४ वयोगटातील आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये डेंगी होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. शहरात सप्टेंबरमध्ये डेंगीच्या ६८३ संशयित रुग्णांची नोंद झाली. यापैकी ७० रुग्णांना डेंगीचे निदान झाले आहे. १९ ऑक्टोबरपर्यंत ४९१ संशयित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी २२ रुग्णांना डेंगीचे निदान झाले आहे.

(१४ ऑक्टोबरपर्यंतची आकडेवारी)
रुग्णसंख्या जास्त असलेले जिल्हे

सिंधुदुर्ग ४८५, कोल्हापूर ४२३, नागपूर ३८८, पालघर ३६८, सातारा २६२, यवतमाळ २४७, गोंदिया १७६, रत्नागिरी १७०, सोलापूर १५९, गडचिरोली १६६

रुग्णसंख्या जास्त असलेले महापालिका क्षेत्र
मुंबई ४००३, नागपूर ७६७, नाशिक ५५४, ठाणे ३०१, कल्याण २८१, अमरावती २२७, कोल्हापूर १९३, सांगली १९१, पिंपरी-चिंचवड १७८, सोलापूर १६७, पुणे १८७

रुग्णवाढीची कारणे?

– यंदा थांबून थांबून झालेला पाऊस
– डासांच्या उत्पतीसाठी पोषक वातावरण
– डेंगीच्या प्रत्येक रुग्णांची नोंद
– शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले बांधकाम
– वातावरणामुळे डासांच्या उत्पती स्थानांची संख्या वाढली
राज्यात यंदा रब्बीचा पेरा घटला! केवळ ३ टक्के क्षेत्रावरच पेरण्या, पावसामुळे हंगाम धोक्यात
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यंदा गंभीर रुग्णांची संख्या कमी असल्याने अतिदक्षता विभागात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे; तसेच मृत्यूचे प्रमाणदेखील कमी आहे. डेंगीच्या विषाणूमध्ये काही बदल झाला का? याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.- डॉ. अमित द्रविड, संसर्गजन्यरोग तज्ज्ञ

यंदा राज्यातील शहरी भागांमधील महापालिका क्षेत्रात डेंगीचे ६३ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. राज्यामध्ये डेंगीच्या रुग्णांची तपासणी आणि सर्वेक्षण वाढले आहे. रुग्णसंख्या वाढली असली, तरी मृत्यूचे प्रमाण घटले आहे.- डॉ. प्रतापसिंह सारनिकर, सहसंचालक, हिवताप हत्तीरोग विभाग

राज्यात यंदा थांबून थांबून पाऊस पडला आहे. यामुळे तापमानामध्ये बदल झाल्याने डासांच्या उत्पत्ती स्थानांमध्ये वाढ झाली. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.- डॉ. महेंद्र जगताप, राज्य कीटक शास्त्रज्ञ, आरोग्य विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed