• Mon. Nov 25th, 2024

    छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा कुपवाडा (जम्मू काश्मीर) येथे उभारण्यासाठी राजधानीतून रवाना

    ByMH LIVE NEWS

    Oct 24, 2023
    छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा कुपवाडा (जम्मू काश्मीर) येथे उभारण्यासाठी राजधानीतून रवाना

    नवी दिल्ली, दि. २३ : जम्मू आणि काश्मीर सीमेवरील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून हा पुतळा राजधानीतील महाराष्ट्र सदनातून निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कुपवाडाकडे आज सकाळी रवाना करण्यात आला.

    राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा समारंभपूर्वक कुपवाडा येथे 20 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथून रवाना करण्यात आला होता. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते.

    हा पुतळा दिल्लीहून रवाना होण्यापूर्वी दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे येथील महाराष्ट्र सदनात  काल उशीरा रात्री  एक लहान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी प्रतिष्ठानतर्फे  निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदर सिंग, सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावर,  मेजर जनरल सुजित पाटील, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या सोहळ्यास दिल्लीतील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    राजभवनातून रवाना होणारा छत्रपतींचा हा पुतळा बडोदा, दिल्लीमार्गे रस्त्याने प्रवास करून साधारणत: दहा ते बारा दिवसात कुपवाडा येथे पोहोचेल.

    ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्यावतीने जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे भारत पाक सीमेवर मराठ्यांच्या पराक्रमाची माहिती देण्यासाठी छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. ‘आम्ही पुणेकर फाउंडेशन’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेला हा पुतळा कुपवाडा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटला स्थापनेसाठी देण्यात येणार आहे. भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते दि. २० मार्च २०२३ रोजी झाले. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दीर्घकाळ तग धरेल असा बनवला गेला आहे.

    ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी माहिती देताना सांगितले की, परिस्थिती अनुकूल असल्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 7 नोव्हेंबर रोजी पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *