आमदार हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी कावळे कुटुंबिंयाची भेट घेत एक लाख रुपयाच्या आर्थिक मदत धनादेश सुपुर्द केला. सुनील कावळे यांच्या नावे असलेले पीक कर्ज व इतर कर्जाबाबतची माहिती घेत त्या विषयातही बँकेकडून मदत करून घेण्याचे व शासनाकडून मिळणारी मदत कावळे कुटुंबीयांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे बागडे यांनी सांगितले. तसेच, याप्रसंगी कावळे यांचा मुलगा नागेश सुनील कावळे याला उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवर कनिष्ठ लिपिक या पदावरील नोकरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगत नियुक्तीपत्र सुनील कावळे यांच्या पत्नी अंजनाताई कावळे व मुलगा सुनील कावळे यांना देण्यात आले.
मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या सुनील कावळे यांनी मुंबईतील वांद्रे परिसरात आत्महत्या केली होती. १८ ऑक्टोबरच्या रात्री BKC येथील उड्डाणपुलावरील लोखंडी खांबला गळफास घेतला. सुनिल कावळे यांनी स्वतःचा शर्ट आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचे लिहले होते. कावळे हे जालन्याहून एकटेच मुंबईत आले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिले होते. सुनील कावळे यांच्यानंतर मराठा समाजातील अनेक तरुणांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आपले आयुष्य संपवले होते. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख राजकीय नेत्यांनी मराठा तरुणांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले होते.