• Sat. Sep 21st, 2024
Navi Mumbai: ‘तारीख पे तारीख’,  नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पुन्हा लांबणीवर

नवी मुंबई : ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने’ अशीच काहीशी गत सिडकोने उभारलेल्या नवी मुंबई मेट्रोची झाली आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पुन्हा अनिश्चित कालावधीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी एकाच महिन्यात पंतप्रधानांच्या चार वेळा तारखा जाहीर करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख पे तारीख दिली जात असल्यामुळे राज्य शासनासह सिडको व जिल्हाधिकारी रायगड कार्यालयातील अधिकारी हवालदिल झाले आहेत.

सिडको व्यवस्थापनाने नवी मुंबई मेट्रो व नमो महिला सशक्तीकरण मोहिमेच्या कार्यक्रमासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर एक लाख महिला उपस्थित राहतील असे गृहित धरून आवश्यक मंडप उभारणी व इतर सोयीसुविधा पुरविण्याकरीता किमान पाच कोटी खर्च अपेक्षित धरून निविदाही काढल्या आहेत. परंतु, पंतप्रधानांचा ३० ऑक्टोबरचा संभाव्य दौरा पुढे ढकलण्यात आल्याचा संदेश पंतप्रधान कार्यालयाकडून राज्य शासनासह सर्व आयोजकांच्या मोबाइलवर धडकला. पंतप्रधानांचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याने अधिकारी वर्गाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र, आता ऐन दिवाळीत पंतप्रधानांनी नवी मुंबईचा दौरा आखू नये, अशी मनोमन प्रार्थना या अधिकारी वर्गाकडून केली जात आहे.

Lalit Patil: ड्रग्ज रॅकेटमध्ये मंत्री, पोलिसांचा सहभाग; ललित पाटीलचा एन्काउंटर होईल: रवींद्र धंगेकर
उद्‌घाटन खर्च १२ कोटीहून अधिक होणार?

पनवेल सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या शुभारंभासह राज्य सरकारच्या काही प्रकल्पांचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडण्याची शक्यता आहे. आता हा उद्‌घाटन सोहळा लांबणीवर पडला असला तरी काही तासांच्या या सोहळ्यासाठी ६ लाख चौरस फुटांचे मैदान विकसित करण्यासाठी सिडको तब्बल ८ कोटी १६ लाख रुपये खर्च करणार आहे. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सिडकोकडून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला याव्यतिरिक्त पाच कोटी रुपये अदा केले जाणार आहेत. महाराष्ट्रातील सर्वांत श्रीमंत महामंडळ अशी ओळख असलेल्या सिडको मेट्रोच्या उद्‌घाटनाला आपल्या श्रीमंतीचे दर्शन घडविणार आहे. सहा लाख चौरस फुटांचा जर्मन हँगर प्रकारचा भव्य मंडप उभारणी ते मंडपात कुलर, वातानुकूलन यंत्रणेचे नियोजन केले जाणार आहे. एवढ्यावरच न थांबता सिडकोकडून याच कार्यक्रमासाठी याव्यतिरिक्त आणखी ८ कोटी १६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू असलेल्या जागेत कार्यक्रमासाठी सिडकोला मैदान उभे करावे लागणार आहे. या जागेवर दगडी भराव असल्यामुळे मातीचा भराव टाकून मैदान तयार करावे लागणार आहे. त्यासाठी २ कोटी ५० लाख ४९ हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रभरातून येणाऱ्या अडीच हजार बस व पाच हजार लहान वाहनांसाठी पार्किंगसाठी मैदान (२ कोटी ४६ लाख २८ हजार रुपये) आणि तिसऱ्या टप्प्यात मैदानाचे प्रवेशमार्ग आणि स्टेजच्या मागील रस्ता विकसित करण्यासाठी तब्बल ३ कोटी २० लाख ४ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. विमानतळाचे काम पाहणाऱ्या अधीक्षक अभियंता कार्यालयाने या कामांच्या निविदा मागील दोन दिवसांत प्रसिद्ध केल्या आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रोचे उद्‌घाटन करण्यासाठी एक दिवसाच्या कार्यक्रमावर एकूण १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार आहे. दरम्यान, पंतप्रधानांचा दौरा पुढे ढकलल्याचा संदेश मिळताच शनिवारी रात्री सुरू करण्यात आलेले मैदानाचे काम रविवारी रात्री बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गिरणा नदीत ड्रग्जच्या गोण्या, ललित पाटीलने फेकल्याचा संशय, मुंबई पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये काय सापडलं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed