• Sat. Sep 21st, 2024

आरोपीला सोडवण्यासाठी थेट न्यायाधीशांचीच खोटी सही; मुंबईत महिला वकिलाचं धक्कादायक कृत्य

आरोपीला सोडवण्यासाठी थेट न्यायाधीशांचीच खोटी सही; मुंबईत महिला वकिलाचं धक्कादायक कृत्य

मुंबई : हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने न्यायाधीशांची खोटी सही करून जामीन आदेश काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन वेळा जामीन आदेश सादर करूनही जामीन मिळत नसल्याने आरोपीच्या पत्नीने अधिक माहिती काढली, त्यावेळी जामीन आदेशच बनावट असल्याचे उघड झाले.

काय आहे प्रकरण?

दहिसरमधील एका शिक्षकेच्या पतीला जुलै २०२१मध्ये हत्येच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती. सध्या तिचा पती ठाणे मध्यवर्ती कारागृहात आहे. पतीला जामीन मिळविण्यासाठी शिक्षिकेची प्रयत्न सुरू होते आणि त्यासाठी ती वकिलाच्या शोधात होती. याचदरम्यान तिची ओळख बोरिवलीच्या शांतिवनमध्ये कार्यालय असलेल्या महिला वकिलासोबत झाली. शिक्षकेने पतीवरील गुन्ह्याचे सर्व कागदपत्र या महिला वकिलापुढे ठेवले.

जामीन मिळवून देण्याचे आश्वासन देत या महिला वकिलाने त्यासाठी ६५ हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. शिक्षकेने जमवाजमव करून रक्कम उभी केली आणि वकिलास दिली. तिने जामीन अर्जावर शिक्षकेची सही घेतली आणि दिंडोशी कोर्टात दाखल केल्याचे सांगितले. दोन महिन्यांनी दिंडोशी कोर्टातील न्यायाधीश ए. व्ही. धुलधुले २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केल्याचे वकील महिलेने सांगितले. शिक्षिकेने २५ हजार रुपये नेऊन देताच वकिलाने जामीन आदेश दिले आणि तुरुंगात नेऊन देण्यास सांगितले.

पती जामीनावरून सुटणार म्हणून शिक्षिका आनंदात होती. तिने बंद लिफाफ्यात असलेले आदेश कारागृहाच्या पेटीत नेऊन टाकले. आदेश सादर करूनही पतीच्या सुटकेबाबत काहीच हालचाल दिसत नसल्याने तिने कारागृहात जाऊन चौकशी केली. जामीनाचे आदेश अपुरे आणि २५ हजार भरल्याची पावती नसल्याचे तुरुंगातून सांगण्यात आले. यावर महिला वकिलाकडे विचारणा केली असता तुरुंगाची चूक असल्याचे सांगत तिने पुन्हा आदेश आणि पैसे भरलेल्या पावतीची प्रत दिली. शिक्षिकेने पुन्हा हे आदेश जमा केले. यावेळी तुरुंग अधिकाऱ्यांना वकिलांना घेऊन येण्यास सांगितले. महिला वकील एकटी तुरुंगात जाऊन आली आणि तुमच्या पतीविरोधात तक्रारी असल्याने जामीन मिळत नसल्याचे सांगितले. सर्व काही संशयास्पद वाटत असल्याने शिक्षिकेने एका संस्थेची मदत घेतली. त्यांनी ज्यावेळी शहानिशा केली त्यावेळी हे आदेशच बनावट असल्याचे दिसून आले.

शेकडो महिलांची उपस्थिती; मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर देवीची आराधना

… म्हणून केले पैसे परत

बनावट आदेशाबाबत विचारणा केल्यावर चोरी पकडली गेल्याचे महिला वकिलाच्या लक्षात आले. तिने शिक्षिकेला बोलावून घेतलेली सर्व रक्कम परत केली आणि तसे लिहूनही घेतले. पण या महिला वकिलाने आणखी एका आरोपीच्या नातेवाईकालाही अशाच प्रकारे फसविले होते. त्यामुळे या वकिल महिलेस धडा शिकविण्यासाठी शिक्षिकेने दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed