तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांना रांगेत उभारून बराच वेळ दर्शनासाठी ताटकळावे लागते. त्यामुळे मंदिर संस्थांच्यावतीने तात्काळ दर्शनासाठी व्हीआयपी पासची व्यवस्था केलेली आहे. व्हीआयपी म्हणजे अतिमहत्त्वाचा व्यक्ती म्हणजेच मुख्यमंत्री, केंद्र व राज्यातील मंत्री, सनदी अधिकारी यांचा यामध्ये समावेश होतो. मात्र, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे व्यवस्थापक सोमनाथ माळी यांनी या नियमाला हरताळ फासले आहे.
त्यांनी मर्जीतील व ओळखीच्या लोकांना व्हीआयपी पास देऊन सुलभ दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देत एक प्रकारे त्यांना पायघड्या घालण्याचे महापाप केले आहे. एकीकडे राज्यातील सामान्य भाविक भक्त पायी चालत येऊन रांगेत तास न् तास थांबून देवीच्या दर्शनासाठी उभे आहेत. तर दुसरीकडे उपविभागीय अधिकारी खरमाटे व व्यवस्थापक माळी यांनी मनमानीपणे त्यांच्या मर्जीतील लोकांना व्हीआयपी दर्शनाचे पास तात्काळ व त्यांच्या सोयीनुसार उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे भाविकांवर अन्याय तर आहेच परंतू मंदिर संस्थानाचे अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत.
शारदीय नवरात्र उत्सव अतिशय शांततेत पार पाडावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे वेगवेगळ्या पातळीवर काम करीत आहेत. मात्र, अशा काही उपद्रवी अधिकाऱ्यांमुळे त्या कामावर पाणी फेरण्याचे काम होत असल्यामुळे डॉ ओंबासे कारवाई करतील का ? असा प्रश्न भाविक विचारत आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News