भाजप नेते पवार हे १९९० पासून भाजपमध्ये सक्रीय आहेत. भाजपचे सरचिटणीस, युवा अध्यक्ष, जिल्हाअध्यक्ष, शहराध्यक्ष, महापालिकेत नगरसेवक, सत्तारुढपक्ष नेते अशी पदे त्यांनी भुषविली आहे. पवार यांनी शहरातील सर्वच जुन्या नेत्यांच्या बरोबरीने भाजपचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने शहर भाजपमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, आपण मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठीच राजीनामा देत असल्याचे सांगत पवार यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाचा सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.
पवार म्हणाले, गेली ३० ते ३२ वर्षे भाजपमध्ये सक्रीय काम करत आहेत. शहराध्यक्ष अकुंश लांडगे यांच्या निधनानंतर झालेल्या दंगलीत माझ्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. जनतेसाठी केलेल्या आंदोलनांमुळे माझ्यावर शंभरपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. राज्यातील भाजपच्या सर्व नेत्यांबरोबर काम करण्याची संधी मला भेटली. भाजपने मला भरभरून दिले. मात्र, मी पक्षासाठी भरभरून काम केल्याने पक्षाने मला पदे दिली. या पदाला साजेशी कामगिरीही मी केली. मात्र, सध्याची परस्थिती पाहता मराठा समाजाची परस्थिती अत्यंत वाईट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठीच मी राजीनामा दिला आहे.
शिंदे, पवार तमाशा पाहत आहेत….
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत जात त्यांनी मराठा आरक्षणासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा समाजाचे असूनही समाजासाठी काम करताना दिसत नाही. चाळीस दिवस जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु असताना त्यांनी फक्त आंदोलनाचा तमाशा पाहण्याचे काम केले. तसेच मराठा समाजाच्या नजरेत देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन करण्याचे काम ते करत आहे, अशी टीका पवार यांनी केली
शिवसेनेत प्रवेश ?
एकनाथ पवार यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा देत राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले असले तरी पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. येत्या २७ ऑक्टोबरला ते आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. कोणत्या पक्षात प्रवेश करायचा, राजकीय जीवनात सक्रीय रहायचे की नाही, याबाबत ते २७ ऑक्टोबरला बोलणार आहेत.
दरम्यान, नांदेड मधील लोहा कंधार या विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांना शिवसेना (ठाकरे गट) पक्षाकडून तिकीट मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला पाठींबा देत भाजपचा राजीनामा देत ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चाही रंगली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News