या आगीमध्ये कल्पना राठोड यांची दोन वर्षाची मुलगी त्रिशा राठोड आणि दोन महिन्यांचे बाळ मालविक गंभीरपणे भाजले होते. त्याच्या पायाखालचा भाग होरपळून निघाला होता. या दोघांना प्लास्टिक सर्जरीसाठी कस्तुरबा रुग्णालयामध्ये आईसोबत दाखल करण्यात आले होते. त्यांना काल संध्याकाळी कस्तुरबा रुग्णालयामधून घरी सोडण्यात आले. बाळाच्या पायावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. कपड्यांच्या गाठोड्याला अडखळून ही बाळं त्यांच्या आईच्या हातातून गाठोड्यांवर पडली होती. त्यात ती भाजून निघाली होती. या चिमुकल्या बाळांना आगीच्या त्या वेदना कशा सहन होतील या कल्पनेनेही त्यांचे रुग्णालयामध्ये असलेल्या आजोबांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना हंबरडा फोडला होता.
रुग्णालयामधील ते दिवस कुटुंबासाठी खूप कठीण होते, असे या बाळांचे आजोबा अशोक राठोड यांनी सांगितले. डोक्यावरचे छप्पर गेले होते. या लेकरांचे कसे होईल, सून बरी होऊन घरी येईल का, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात यायचे. इतक्या लहान मुलांना या वेदना कशा सहन होतील ही घालमेलही त्यांच्या मनामध्ये होती. मात्र या दोन्ही लहान बाळांची येथील डॉक्टरांनी तसेच परिचारिकांनी आईच्या मायेने काळजी घेतली हे राठोड यांनी आवर्जून सांगितले. या दोन्ही बाळांच्या तसेच त्यांच्या आईच्या जिवावरचा धोका टळला असल्याचे कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी सांगितले.
व्हेन्टिलेटवरचे ते पाच दिवस
सफाई कर्मचारी म्हणून जयभवानी इमारतीमध्ये काम करणाऱ्या भीषन तुषांभर यांनाही रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. आगीमध्ये सापडल्यानंतर ते घुसमटून गेले. श्वसनमार्गालाही आगीचा दाह लागला होता. भाजल्याच्या खुणा शरीरावर होत्या. त्यांना कूपर रुग्णालयामध्ये आणण्यात आले त्यावेळी त्यांची अवस्था पाहून क्षणाचाही विचार न करता त्यांना व्हेन्टिलेटवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तुषांभर यांची त्यावेळची अवस्था अत्यंत नाजूक होती, असे डॉ. नीलम रेडकर यांनी सांगितले. त्यांना व्हेन्टिलेटवर ठेवण्यात उशीर केला असता तर त्यांची प्रकृती अधिक बिघडली असती. सहा दिवसानंतर त्यामध्ये थोडी सुधारणा झाली, त्यानंतर त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. स्थिर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याचे डॉ. रेडकर यांनी सांगितले. मला, माझ्या पत्नीला तसेच मुलांनाही रुग्णालयाने जीवनदान दिल्याची भावना तुषांभर यांनी महाराष्ट्र टाइम्सकडे व्यक्त केली.