अशोक जंगम व रवींद्र जंगम या भावांनी शेतीची कामे वेळेत व लवकर पूर्ण व्हावीत, इतरांना जड सामान वाहून नेण्यासाठी उपयोग होईल या उद्देशाने कर्जाने ट्रॅक्टर खरेदी केला. मात्र, पठारावर जाण्यासाठी पाउलवाट व लोखंडी शिडीशिवाय मार्ग नसल्यामुळे ट्रॅक्टर वर न्यायचा कसा, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. कोर्ले-व्याहाळी मार्गे ट्रॅक्टर पायथ्यापर्यंत नेण्यात आला. ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करणारे कारागीर बोलावले. त्यांनी इंजिन, चाके, मुख्य सांगाडा, ट्रॉली आदी सहा भाग वेगळे केले. त्यानंतर प्रत्येक भाग स्वतंत्रपणे वर नेण्यासाठी शेतकऱ्यांची २५ पथके तयार करण्यात आली.
प्रत्येक सुटा भाग वर नेण्यासाठी रस्सी, बांबू व लाकडाची डोली यांचा वापर करण्यात आला. शिडी चढून गेल्यावर कारागीरांनी ट्रॅक्टर पुन्हा जोडला. तेथून तो गावठाणात नेण्यात आला. प्रथमच चारचाकी वाहन वर गेल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यापूर्वी पठारावर ‘महावितरण’च्या ठेकेदाराने अशाच प्रकारे ग्रामस्थांच्या मदतीने मोठे लोखंडी खांब, डीपी व इतर सामान वाहून नेऊन वीज सुरू केली होती. त्याचीच आठवण अनेकांना या प्रसंगी झाली.
पठाराची समुद्र सपाटीपासून उंची चार हजार ६९४ फूट आहे. सध्या तेथे ४५ कुटुंबे असून, ३०० लोकसंख्या आहे. भात, गहू, वरई, नाचणी, दुधाचा जोडधंदा यावर ग्रामस्थ गुजराण करतात. कोर्लेपर्यंत वाहने जातात; तेथून शिडी व पाऊलवाटेने वर जावे लागते. गेल्या वर्षी ग्रामस्थांनी तीन दुचाकी वर नेल्या. त्यामुळे पठारावरील तीन किलोमीटरच्या परिसरात किरकोळ ओझे, आजारी व वृद्धांना लोखंडी शिडीपर्यंत आणण्यासाठी दुचाकीचा उपयोग केला जातो.
ट्रॅक्टर वर आणण्यासाठी ग्रामस्थांची मोठी मदत झाली. शेतीची कामे लवकर आणि वेळेत करणे, इतर शेतकऱ्यांना अवजड कामांना भाडेतत्त्वावर देणे, शेतीची मशागत व इतर कामासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करणार आहे. त्यातून येणाऱ्या पैशांतून कर्ज फेडणार आहे. आताच ट्रॅक्टरला इतरांकडून मागणी सुरू झाली आहे.
– रवींद्र जंगम, ट्रॅक्टर मालक