नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ५ ऑक्टोबर रोजी झोपडीतून ५४.४ ग्रॅम ‘एमडी’सह एक किलो गांजा असा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या प्रकरणात वसीम रफिक शेख (वय ३६) आणि नसरीन ऊर्फ छोटी भाभी इम्तियाज शेख (३२, रा. सादिकनगर, वडाळा गाव) या दोघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून पथकाने सात-आठ मोबाइल जप्त केले. त्यातून छोटी भाभीचा पती संशयित इम्तियाज याला जिल्ह्याबाहेरून अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी सुरू असताना पोलिसांना एमडी भिवंडीतून येत असल्याची माहिती पथकाला समजली. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी तपासाचे निर्देश दिले. सहायक निरीक्षक हेमंत नागरे आणि हेमंत फड यांनी संशयित इम्तियाजची कसून चौकशी केल्यावर त्याने मुंबईतल्या सलमान नावाच्या संशयिताकडून ड्रग्ज घेतल्याचं सांगितलं. त्यावरून पथकाने संशयित सलमान याला ताब्यात घेतले. त्यामुळे वडाळा गावासह नाशिकमध्ये विक्री होणारे एमडी मुंबईतून येत असल्याचं उघड झाले आहे. तर, एमडीच्या पुरवठादारापर्यंत पोलिस पोहोचल्याने ही साखळी अधिक उघड होण्याची शक्यता आहे.
दागिन्यांची खरेदी कशी?
संशयित भूषण पानपाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्याकडून पोलिसांनी तीन किलो सोने जप्त केले आहे. तर, या दोघांनी ललितच्या मदतीने ड्रग्जच्या पैशांतून तब्बल आठ किलो सोने खरेदी केल्याच्या प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार, त्यांनी हे सोने कोणत्या स्वरूपात खरेदी केले, पैसे रोख दिले की ऑनलाइन व्यवहार झाले, कोणत्या सराफ व्यावसायिकांकडून ही खरेदी झाली यासंदर्भातील तपास पुणे पोलिसांनी सुरू केला आहे. अद्याप यासंदर्भात कोणत्याही सराफाकडे चौकशी केलेली नाही.
‘सप्लायर’ टोळी कोठडीत
सामनगाव येथील १२.५ ग्रॅम एमडी प्रकरणात आतापर्यंत गणेश संजय शर्मा, गोविंदा संजय साबळे, आतिश उर्फ गुड्या शांताराम चौधरी हे सर्व अटकेत आहेत. नव्याने अर्जुन सुरेश पिवाल, सनी अरुण पगारे, सुमित अरुण पगारे आणि मनोज ऊर्फ मन्ना भरत गांगुर्डे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, शिंदे गाव एमडी कारखानाप्रकरणी शिवा अंबादास शिंदे, संजय ऊर्फ बंटी काळे, समाधान बाबूराव कांबळे हे संशयित निष्पन्न झाले आहेत. यासह वडाळा गावातील ५४.५ ग्रॅम एमडी प्रकरणात वसीम रफिक शेख, नसरिन ऊर्फ छोटी भाभी, इम्तियाज ऊर्फ राजा उमर शेख यांना अटक करून एकाला ताब्यात घेतले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News