• Mon. Nov 25th, 2024
    ठाकरेंच्या जोडीला चव्हाण, काँग्रेसकडून मराठमोळ्या नेत्यांवर दक्षिणेची जबाबदारी, तेलंगणा सर करणार?

    नांदेड: तेलगंणा राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण यांची काँग्रेसच्या विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खर्गे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. अशोक चव्हाण सोबतच कर्नाटक राज्याचे मंत्री एन.एस. बोसराजू यांची देखील विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
    महाराष्ट्रात आलेले अनेक प्रकल्पही चांगल्या सवलती देऊनही गुजरातने पळविले, अनिल देशमुखांचं टीकास्त्र
    निवडणूक आयोगाने तेलगंणा राज्यासह छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोरम या पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकीची घोषणा नुकतीच केली आहे. त्यानुसार पाच ही राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. तेलगंणा राज्यात ११९ जागेसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. पाच ही विधानसभेसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेसकडून तयारी देखील आखली जात आहे. त्यातच पाच ही विधानसभेसाठी काँग्रेसकडून विशेष निरीक्षक म्हणून निवड केली जात आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देखील मोठी जबाबदारी काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

    राज्याच्या राजकारणात मागील काही दशकांपासून महत्वाची भूमिका वठवणाऱ्या अशोक चव्हाणांवर गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावर अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. उदयपूर आणि रायपूर येथील राष्ट्रीय अधिवेशनांमध्ये त्यांना राजकीय मसुदा समितीची जबाबदारी देण्यात आली होती. गोवा, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांमध्ये ते काँग्रेसचे स्टार प्रचारक होते. आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरी या पाच राज्यातील निवडणुकींच्या समीक्षेची जबाबदारीही त्यांच्याकडेच देण्यात आली होती. मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी त्यांना काँग्रेस पक्षाचे समन्वयक म्हणून नेमण्यात आले होते. काँग्रेस पक्षात सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या काँग्रेस कार्यसमितीवरही त्यांना नुकतेच स्थान देण्यात आले. आता त्यांच्यावर तेलंगणा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे विशेष निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

    वंचित बहुजन आघाडीनं मविआसोबत यावं, अशोक चव्हाणांनी साद घातली

    नांदेड जिल्ह्याच्या सीमावरती तेलंगणा आणि कर्नाटक ही दोन्ही राज्य येतात. त्यामुळे यापूर्वी कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना स्टार प्रचारक म्हणून पाठविण्यात आले होते. त्यांचा हा झंजावती प्रचारही चर्चेचा विषय ठरला होता. त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांच्या प्रयत्नांना या ठिकाणी यश मिळाले. कर्नाटकातील चित्र पालटले. त्यामुळे आता तेलंगणात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी अशोक चव्हाण यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माणिकराव ठाकरे यांची तेलंगणाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील चार ते पाच तालुके प्रामुख्याने तेलंगणाच्या सीमेवर आहेत. यातील भोकर हा चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. तर देगलूर-बिलोली हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच आहे. त्यामुळे त्यांना याचा कितपत फायदा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed