• Sat. Sep 21st, 2024

दिव्यांगांनी एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात करावी -राज्यपाल रमेश बैस

ByMH LIVE NEWS

Oct 21, 2023
दिव्यांगांनी एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात करावी -राज्यपाल रमेश बैस

मुंबई,दि. २१: कृत्रिम प्रज्ञा व मशीन लर्निंगच्या आजच्या काळात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. परंतु, त्यासोबतच अनेक कौशल्ये कालबाह्य ठरत आहेत.  या पार्श्वभूमीवर दिव्यांग पुरुष व महिलांनी एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात करावी;  स्वतःकडे असलेली कौशल्ये उन्नत करावी तसेच पारंपरिक कौशल्ये जोपासावी, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली.

राज्यपाल श्री.  बैस यांनी आज  वरळी मुंबई येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या संस्थेला भेट देऊन दृष्टिबाधित महिलांना ‘स्वयंरोजगार किट’चे वाटप केले, त्यावेळी ते बोलत होते.

जगातील काही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. त्याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. आयटी क्षेत्रासह इतर क्षेत्रामध्ये नोकऱ्या असुरक्षित आहेत. अश्यावेळी बहुकौशल्यामुळे दिव्यांगांना विपरीत परिस्थितीवर मात करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

स्थापनेपासून गेल्या ७१ वर्षांमध्ये ‘नॅब’ संस्थेतर्फे दिव्यांग व्यक्तींच्या शिक्षण, प्रशिक्षण व रोजगारासाठी चांगले काम केले जात असल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले. ‘नॅब’च्या समस्यांबाबत आपण संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करु, असे राज्यपालांनी सांगितले.

ऑडिओ पुस्तकांची मागणी केवळ दिव्यांगांकडूनच नाही तर सर्वसामान्यांकडून देखील वाढत आहेत. त्यामुळे ‘नॅब’ने आपली ऑडिओ लायब्ररी अद्ययावत ठेवावी, अशी सूचना राज्यपालांनी केली.  दिव्यांगांना सहानुभूती नको तर सहकार्य व सन्मान हवा असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते ‘नॅब’ला योगदान देणाऱ्या दानशूर व सेवाभावी व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला राज्यपालांनी संस्थेच्या ब्रेल तसेच ऑडिओ बुक विभागांना भेट देऊन पाहणी केली.

‘नॅब’चे अध्यक्ष हेमंत टकले यांनी नॅबच्या कार्याची माहिती दिली तसेच दिव्यांगांसाठी बरेच कार्य होणे गरजेचे असल्याचे सांगितले. संस्थेचे मानद सचिव डॉ. विमलकुमार डेंगला यांनी नॅब संस्थेत ब्रेल पुस्तकांच्या निर्मितीचे देशात सर्वात मोठे काम चालत असल्याचे सांगितले.

‘नॅब’तर्फे अंधेरी मुंबई येथे दिव्यांग महिला व विद्यार्थीनींसाठी वसतिगृह चालविले जात असून सदर वसतिगृहाची इमारत तसेच ‘नॅब’च्या इमारतीची पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.  प्रत्येकी १००० रुपये किमतीच्या स्वयंरोजगार किट देऊन दृष्टिबाधित महिलांना संस्थेतर्फे आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

नॅबच्या कार्यकारी संचालक पल्लवी कदम यांनी प्रास्ताविक केले तर दिव्यांग मुलामुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. मानद सचिव हरेंद्रकुमार मलिक यांनी आभार मानले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed